महाकुंभमेळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातून गेलेल्या भाविकांना अतिशय वाईट अनुभव आलाय. अमरावतीतल्या सुरज मिश्रा याने भाविकांना प्रयागराजला नेलं, मात्र तिथे गेल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार घडलाय. यामुळे परतलेल्या भाविकांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर राडा घातला. प्रयागराजमध्ये या भाविकांना काय अनुभव आला, सुरज मिश्रा कोण आहे, पाहुयात सविस्तर
प्रगाराजहून आलेल्या अमरावतीकरांचा राडा
पोलिस आयुक्तलयाबाहेर संतप्त दिसणारे हे अमरावतीकर नुकतेच प्रयागराजवरून परतलेत. प्रयागराजमध्ये खाण्यापिण्यावाचून आबाळ झाल्याने नागरिक चांगलेच संतापले. अमरावतीतल्या सुरज मिश्रा याने भाविकांना प्रयागराजला नेलं. पण तिथे गेल्यावर या मिश्राने भाविकांना तिथेच सोडून पळ काढल्याची घटना घडली. हा सूरज मिश्रा आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. प्रयागराजमधून परत आल्यावर भाविकांनी मात्र थेट पोलिस आयुक्त कार्यालय गाठत राडा घातला आणि सुरज मिश्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अमरावतीच्या सूरज मिश्राकडून कुंभमेळा दर्शनाची सहल
अमरावतीतून कुंभमेळ्यासाठी 400 भाविकांना नेलं. भाविकांसाठी 7 खासगी बसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक प्रवाशाकडून 6000 रुपये घेण्यात आले. प्रयागराजमध्ये पोहचल्यावर सूरज मिश्राचा पळ काढल्याची माहिती समोर आलीये. त्याने कुंभमेळ्यात जेवण, राहण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही असा आरोप भाविकांनी केला आहे. त्यानंतर भाविकांनी अमरावतीत परतल्यावर पोलीस स्टेशनसमोर राडा केला आहे.
या सगळ्या प्रकरणावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केलीये. गाजावाजा करत भाविकांना प्रयागराज नेलं मात्र तिथे त्यांची फसवणूक केली असा आरोप वानखडेंनी केला. तर नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी सुरज मिश्रावर कारवाईचं आश्वासन दिलंय.
प्रयागराजच्या या वाईट अनुभवानंतर आता भाविक अमरावतीत दाखल झालेत. मात्र या प्रकरणाने भाविकही संतप्त झाले. तीन दिवस अन्न पाण्याविना नागरिकांचे चांगलेच हाल झाले. आता सुरज मिश्रावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.