Beed Crime : बीडमधील गुंडाराजची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. अवैध वाळू आणि राखेची वाहतूक बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.राखेच्या व्यवसायात शेकडो हायवा टिप्पर असल्याचा आरोप अंजली दमानिया सह अनेकांनी केलाय.. त्यामुळे बीडमध्ये नेमके किती टिप्पर आहेत याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बाहेर आलेला आकडा धक्कादायक आहे.
प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार बीड जिल्ह्यात तब्बल साडेबाराशे टिप्पर आहेत. बीड जिल्ह्यात गोदावरी पट्ट्यातील वाळू उपशासाठी आणि परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परांची संख्या तब्बल साडेबाराशे इतकी आहे. त्यात सर्वाधिक टिप्पर हे अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असून त्यातील परळी तालुक्यात सर्वाधिक 276 टिप्पर असल्याची माहिती आहे.
बीडमधील टिप्परची हीअधिकृत माहिती. मात्र ही माहिती अत्यंत तोकडी असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट आणि त्याहून ही जास्त चालत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत टिप्परचा मुद्दा उपस्थित केल्याने एकच खळबळ उडालीय.
अनधिकृत टिप्पर फक्त रात्री वाहतूक करतात. अनधिकृत टिप्परवर नंबर प्लेट लावली जात नाही. खनिज उपशाचा कुठलाही परवाना वाहतूकदाराकडे नसतो. पोलीस आणि महसूलमधील अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचे टिप्पर असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये हा गोरखधंदा सुरू आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या आशिर्वाने हे सगळं सुरू असल्याचाही आरोप झालाय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर याची चौकशी सुरू झालीय.. बीडमधील अवैध वाहतूकीवर आणि बेनामी टिप्परवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे,.
परळी - 276 टिप्पर
अंबाजोगाई - 204 टिप्पर
केज - 113 टिप्पर
धारूर - 69 टिप्पर
माजलगाव - 38 टिप्पर
वडवणी - 6 टिप्पर