मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजकीय वर्तुळात अनेख राजकीय आखाडे बांधले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याची गरज आहे. येत्या काळात तसे प्रयत्न केले जातील, आणि या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. पण रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसनं कुठलीही जबाबदारी दिलेली नाही,' असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे अशी शरद पवारांची इच्छा आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम आघाडी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार आहेत, राजकारणातील आकड्यांचा खेळ आणि घडामोडींचा त्यांना मोठा अनुभव आहे. यादृष्टीने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं
रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तास या दोघांमध्ये राजकारणासंबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व पक्षांना भाजपा विरोधात उभं करायचं असेल तर शरद पवार हा हुकमी एक्का आहे, याची कल्पना प्रशांत किशोर यांना आहे. त्यादृष्टीनेच प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची दृष्टीने भाजप विरोधात आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे.