Varsha Bungalow Official Residence of Chief Minister of Maharashtra : वर्षा बंगल्याप्रकरणी खासदार संजय राऊत रोज नवनवे आरोप आणि दावे करत आहेत. आता त्यांनी वर्षा बंगल्याबाबत आणखी एक नवा आरोपांचा बॉम्बगोळा फोडला आहे. संजय राऊतांच्या दाव्यानुसार वर्षा बंगल्यावर काळी जादू करण्यात आलीये. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगं त्या ठिकाणी पुरल्याचा दावाही त्यांनी केलाय.महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले. सरकार स्थापन झालं. मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं. मंत्र्यांना बंगले मिळाले. पण महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री अजून त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला आलेले नाहीत. यावरुनच आता राज्यात नवं राजकारण सुरु झाले आहे.
महाराष्ट्रात लिंबूवाली गँग सक्रिय असून गेल्या चार पाच वर्षांत सातत्यानं ते अशा पूजा करत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांच्या दाव्यावर शिवसेनेनं टीका केलीय. संजय राऊत अशा गोष्टींवर बोलतात ज्या गोष्टी अस्तित्वातही नाहीत असा टोला शिवसेना आमदार निलेश राणेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल देशमुखांनीही मुख्यमंत्री वर्षावर मुक्कामाला का जात नाही असा सवाल उपस्थित केलाय. संजय राऊतांच्या दाव्यावर तर छगन भुजबळांना हसू आवरता आवरलं नाही. संजय राऊतांनी यापूर्वीही कामाख्यात रेड्यांचा बळी दिल्याचा दावा केला होता. आता तिथं बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं वर्षा बंगल्यावर आणून पुरल्याचा दावा केलाय.
मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला म्हणून वर्षाची ओळख आहे. आता या बंगल्यावर मुक्कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्यानं संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतायेत. लिंबापासून सुरु झालेले आरोप आता शिंगांपर्यंत आल्यानं या पुढं अजून काय आरोप होणार याचे वेगवेगळे आडाखे बांधले जाऊ लागलेत.