Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?

मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 10, 2024, 09:20 AM IST
Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने त्यांच्या उपनगरीय विभागांमध्ये आज म्हणजेच रविवार, 10 नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या काळात जलद आणि हार्बर मार्गावरील सेवांमध्ये बदल करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.

मेन लाइन मेगा ब्लॉक कोणत्या वेळेत? 

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी 10.25 ते दुपारी 2.45  पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या Dn फास्ट लाईन गाड्या माटुंगा येथील Dn स्लो लाईनकडे वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या सर्व स्लो स्टेशनवर थांबतील आणि 15 मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानावर पोहोचतील. त्याचप्रमाणे सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा स्थानकात अप जलद मार्गावर परत जातील.

हार्बर लाईन ब्लॉक वेळापत्रक 

हार्बर मार्गावर, CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 पर्यंत ब्लॉक असेल. दरम्यान, सीएसएमटी ते वाशी, नेरुळ आणि पनवेल या सेवा सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत चालतील आणि गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटी या सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष रेल्वे सेवा उपलब्ध असेल.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 या ब्लॉक कालावधीत मेन लाइन आणि वेस्टर्न लाईन स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना हे बदल लक्षात ठेवावेत आणि गैरसोय टाळण्यासाठी आधीच पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.