Ranveer Allahbadia Instagram Post: युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला असताना, पोलीस त्याला चौकशीसाठी समन्स बजावत आहेत. दरम्यान मुंबई आणि आसाम पोलीस चौकशीसाठी त्याच्या मुंबईतील घरी पोहोचले असता घर बंद होतं. यादरम्यान आता रणवीरने इंस्टाग्रामला एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगितलं आहे. "मी घाबरलो आहे. पण मी पळून जात नाही आहे," असं त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे,
"माझी टीम आणि मी पोलीस आणि इतर प्रशासनाला सहकार्य करत आहोत. मी सर्व प्रक्रिया पूर्ण करेन आणि यंत्रणांना उपलब्ध होईन. मी पालकांबद्दल केलेलं विधान असंवेदनशील आणि अनादर करणारं आहे. आता चांगलं करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी मनापासून खेद व्यक्त कर आहे," असं रणवीरने सांगितलं आहे.
पुढे त्याने लिहिलं आहे की, "मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. लोक मला आणि माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवू असं धमकावत आहेत. काही लोकांनी पेशंट असल्याचं भासवत माझ्या आईच्या दवाखान्यात घुसखोरी केली. मला भिती वाटत आहे आणि काय करावं हे समजत नाही आहे. पण मी पळून जात नाही आहे. माझा पोलीस आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे".
'BeerBiceps' चॅनेलमुळे युट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद पेटला आहे. "तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?", असं अलाहबादियाने एका स्पर्धकाला विचारलं होतं. या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर रणवीर अलाहबादियाने माफीही मागितली.
मुंबई आणि आसाम पोलिसांची टीम शुक्रवारी रणवीर अलाहबादियाच्या वर्सोवा येथील घरी दाखल झाली होती. मात्र त्याचा फ्लॅट बंद होता. एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, मुंबईच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि त्यांची चौकशी करण्यासाठी शहरातील वर्सोवा परिसरातील अपार्टमेंटमध्ये गेले होते.
गुरुवारी अलाहबादियाला मुंबईतील खार येथील पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. आपल्या घरी जबाब नोंदवला जावा अशी विनंती त्याने केली, जी नंतर फेटाळण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आणि त्याच्या घरी पोहोचले.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अपूर्व मखीजा, आशिष चंचलानी, अलाहबादियाचा व्यवस्थापक आणि 'इंडियाज गॉट लेटेंट'चे व्हिडिओ एडिटर यांच्यासह आठ जणांची चौकशी केली आहे. शहर पोलिसांनी अद्याप या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान समय रैनाला मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या सायबर विभागानेही समन्स बजावले आहे, जे स्वतंत्र चौकशी करत आहे. समय रैनाला पाच दिवसात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पण आपण सध्या अमेरिकेत असल्याचं सांगत त्याने अधिक वेळ मागितला आहे.