प्रताप नाईकसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवाजी महाराज प्राण तळहातावर घेऊन शेकडो लढाया लढले. कित्येक मावळ्यांनी, सवंगड्यांनी प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी मालूसरे सारख्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी 6 जून 1674 सालं उजाडावं लागलं. स्वराज्याचं प्रतिक म्हणजे शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन. स्वराज्याच्या सिंहासनाचं पुढं झालं काय? स्वराज्याची निशाणी असलेल्या सिंहासनाचा नंतर उल्लेखच इतिहासात आढळत नाही. 32 मण सोन्याचं हिरे पाचू माणिकांनी मढवलेल्या सिंहासनाचं पुढं काय झालं याची माहितीच मिळत नाही. गेली अनेक दशकं इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी स्वराज्याच्या सिंहासनाचं काय झालं याचा शोध घेतायत. (Chhatrapati Shivaji Maharaj Sinhasan )
मुघल साम्राज्याच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश असताना सह्याद्रीनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं होतं. विजयनगरच्या साम्राज्यानंतर पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या रुपानं हिंदवी साम्राजाला छत्रपती मिळणार होता. मराठा साम्राज्याची ओळख होती ते सिंहासन. म्हणजेच मराठा तख्त.
मराठेशाहीचं तख्तही तसंच साजेसं हवं होतं. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर ज्या सिंहासनावर आरुढ झाले ते सिंहासन सोन्यापासून बनवलेलं होतं. सिंहासनाला हिरे, पाचू, माणिक आणि मौल्यवान रत्नांनी मढवलं होतं. या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ऑक्झेंडन नावाचा इंग्रज अधिकारी आणि नारायण शेणवी नावाचा दुभाषा उपस्थित होता हेनरीच्या डायरीत राजसिंहासनाचा उल्लेख आढळतो.
इतिहासात स्वराज्याच्या सिंहासनांबाबत वेगवेगळी माहिती मिळते. निश्चलपुरी गोसावी यांनी शिवाजी महाराजांचा तांत्रिक राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराज्याभिषेक कल्पतरु नावाचा एक ग्रंथ लिहला. त्या ग्रंथातही सिंहासनाचं वर्णन आहे. त्या सिंहासनावर आठ सिंह कोरले होतं. स्वराज्याचं सिंहासन 32 मण सोन्यापासून बनलं होतं अशी माहिती समोर येते. त्या सिंहासनाबाबत सभासद बखरीतही सविस्तर उल्लेख पाहायला मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून हे सिंहासन संभाजी महाराजांकडं आल्याचं सांगण्यात येतंय. याच काळात औरंगजेबाच्या रुपानं स्वराज्यावर संकट आलं. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागले. कैदेत असताना औरंगजेबानं संभाजी महाराजांना तीन प्रश्न विचारले होते. त्या तीन प्रश्नांपैकी एक प्रश्न सिंहासनासंदर्भात होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार इतिकादखानानं म्हणजेच झुल्फिकारखानानं रायगड किल्ल्याला वेढा दिला. मराठ्यांनी आठ महिने रायगडचा किल्ला लढवला. जिब्राल्टर ऑफ इस्ट अशी ओळख असलेला रायगड सहजासहजी हाती येत नव्हता. पण त्यावेळी बिरवाडीचा देशमुख नरसोजी गायकवाडनं किल्ले रायगडावरची माहिती झुल्फिखानाला दिली. त्यामुळं रायगड येसूबाईंना मुघलांना द्यावा लागला. किल्ला ताब्यात घेताना कोणताही रक्तरंजित लढा झाला नाही. किल्ले रायगडाची सोन्याची किल्ली औरंगजेबाला सोपवण्यात आली. किल्ला मुघलांच्या ताब्यात देताना झुल्फिखार खानाला तीन पेटारे भरुन सोनं मिळाल्याची माहिती आहे. स्वराज्याच्या काही मुद्राही झुल्फिखारखानाच्या हाती लागल्या. पण सिंहासनाचा उल्लेख कुठंही नाही. सिंहासन झुल्फीखार खानानं फोडल्याची माहिती आहे पण त्याचा पुरावा म्हणून कोणतीही कागदपत्रं उपलब्ध नाहीत.
सिंहासन फोडल्याच्या माहितीला कुठल्याच फारशी किंवा बखरीच्या कागदपत्रांतून दुजोरा मिळत नाही. कारण औरंगजेब जेव्हा कोणताही किल्ला जिंकायचा तेव्हा त्याच्या दप्तरी किल्ल्यातून मिळालेल्या सगळ्या मुद्देमालाची नोंद ठेवत असतं. स्वारीतून जिंकलेला सगळ्या वस्तू औरंगजेबाच्या खजिन्यात जमा होत असतं. रायगडावरुन सिंहासन ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद औरंगजेबाच्या दप्तरी दिसत नाही. किंवा तसा कागदही दिसत नाही.
सिंहासनाबाबत आणखी एक दंतकथा सांगितली जाते. ही दंतकथा आहे रायगडच्या वेढ्यावेळीची. रायगडाला जेव्हा झुल्फिकारखानानं वेढा घातला होता. तेव्हा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याआधी येसूबाईंनी सिंहासन योग्य ठिकाणी लपवून ठेवण्याची व्यवस्था केली होती. मोघलांच्या वेढ्यावेळी 144 किलो सोन्याचं सिंहासन सहजासहजी हलवणं कठीण होतं. ही वेळ अशी होती की त्यावेळी मुंगीलाही रायगडाखाली उतरणं शक्य नव्हतं. मग अशावेळी किल्ले रायगडावर सिंहासन पुरण्यात आलं का असा प्रश्नही पडतो. काही जाणकारांच्या मते किल्ले रायगडावरील अतिशय दुर्लक्षित आणि माणसांचा वावर नसलेल्या ठिकाणी सिंहासन जमिनीत पुरलं असावं. काही माहितीगार तर किल्ले रायगडावरील सिंहासन मुघलांपासून सुरक्षित राहावं यासाठी गंगासागर तलावात ठेवल्याचा दावा करतात. पण अभ्यासकांना हा दावा तेवढासा पटत नाही.
किल्ले रायगडावर अशा काही जागा आहेत ज्या जागा सिंहासन लपवण्यासाठी उपयुक्त ठरु शकते असा दावा केला जातोय. यातली एक जागा आहे रत्नशाळा. ज्याला काहीजण खलबतखानाही म्हणतात. किल्ल्याच्या मूळ बांधकामाच्या आत असलेली ही खोली आजही शाबूत आहे. हा खलबतखाना राजसदरेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला हा खलबतखाना आजही गुपितं स्वतःजवळ बाळगून असलल्याचं सांगण्यात येतंय. या जागेचा वापर छत्रपती शिवाजी महाराज गुप्त खलबतं करण्यासाठी वापर करत होते असाही दावा केला जातो. पण खलबतखान्याची मध्यवर्ती जागा आहे. त्यामुळं ती रत्नशाळा किंवा खजिन्याची खोलीही असावी असंही सांगण्यात येतंय.
खलबतखान्याची ही खोली आज बरीच रहस्य तिच्या उदरात घेऊन असल्याचं सांगण्यात येतंय. खलबतखान्याची ही खोली जेवढी दिसते तेवढ्याच आकाराची आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसते. पण प्रत्यक्षात जेव्हा खलबतखान्याच्या खोलीची मापं घेतली जातात तेव्हा सध्याचा निम्माच भाग आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर या खलबतखान्याला समांतर अजून एक खोली या भागात असावी असा अंदाज आहे.
मुघलांच्या हल्ल्यावेळी सिंहासन त्या गुप्त भुयारात आणून ठेवलं असावं असं सांगण्यात येतंय. पण सिंहासनाचा आकार आणि तळघराचा दरवाज्याचा छोटा आकार पाहाता त्या मार्गानं सिंहासन जसंच्या तसं आणल्याची शक्यता कमी वाटते. किल्ले रायगडावरील धान्याच्या कोठारांजवळही अशीच एक खोली असावी असा अंदाज आहे. त्या खोलीचं उत्खनन पुरातत्व खात्याकडून व्हावं अशी मागणी होतेय.
सिंहासनाच्या किल्ले रायगडावरच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. 1689 पासून 1707 ते 1708 पर्यंत हा किल्ला थेट मुघलांच्या ताब्यात होता. तर 1708 ते 1733 पर्यंत हा किल्ला जंजि-याच्या सिद्दीच्या ताब्यात होता. या काळात सिंहासन कुठं होतं कसं होतं याचा उल्लेख सापडत नाही.
या काळात सिंहासनाचा शोध घेतला नसेल असं वाटत नाही. त्यावेळी एक प्रचलित पद्धत होती. किल्ला ताब्यात आला की त्या ठिकाणी खणत्या लावायच्या. म्हणजे किल्ल्यात सोनंनाणं लपवता येईल अशी सगळी ठिकाणं खणून काढायची. त्या खणत्याच्याही हाती काही लागलं नसावं याची शक्यता कमी आहे. पण त्यावेळी असं काही सापडलं असतं तर मोघलांच्या दप्तरी तशी नोंद असती. पण तशी नोंदही कुठंही सापडत नाही. सिंहासन लपवण्यासाठी सहज सापडेल अशी जागा किंवा भुयाराची निवड केली जाणं शक्य नाही. ज्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. त्या दूरदर्शी राजानं काहीतरी व्यवस्था केली असावी असं इतिहास अभ्यासकांना वाटतं.
किल्ले रायगड हा मुख्य बालेकिल्ल्याचा परिसर सोडला तर खूपच विस्तृत जागा आहे. त्यामुळं किल्ले रायगडावर अनेक ठिकाणं आहेत जिथं सिंहासन लपवण्यासाठी जागा असू शकते. पुन्हा शिवकाळाचा विचार केला तर 1689 साली जेव्हा झुल्फिखान खानानं वेढा दिला तेव्हा मराठ्यांनी जवळपास मार्च ते नोव्हेंबर आठ महिने किल्ला लढवला होता. त्यामुळं हा काळ सिंहासन योग्य ठिकाणी लपवण्यासाठी पुरेसा होता असे जाणकार सांगतात.
किल्ले रायगडावरील मुख्य किल्ल्याचा भाग वगळला तर किल्ल्यावर अजूनही उत्खननासाठी खूप जागा शिल्लक आहे. जिथं पुरातत्व विभागानंही उत्खनन केलेलं नाही. किल्ले रायगडावर अशा अनेक जागा आहेत जिथं माणसं जात नाही. आडबाजूच्या अशा जागांवर पुरातत्व विभागानं संशोधन केलं पाहिजे. अशा जागांचा शोध घेतल्यास, उत्खनन केल्यास शिवकाळातील अनेक रहस्यांचा उलगडा होईल. कदाचित सिंहासनाबाबत मोठी माहितीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवकाळानंतर छत्रपती शाहूंनी 1733 साली किल्ले रायगड पुन्हा जिंकून घेतला. त्याकाळात सिंहासनाचा फारसा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक साधनांमध्ये दिसत नाही. पण पुढच्या काळात 1773च्या काळात पेशव्यांच्या कार्यकाळात रायगडावरील सिंहासनाचा पुन्हा उल्लेख आढळतो. 1773मध्ये पेशव्यांचे कारभारी अप्पाजी हरी यांनी किल्ले रायगडावर आल्यावर सिंहासनाला मुजरा केल्याचा उल्लेख आहे.
32 मण सोन्याचं होतं म्हणून किल्ले रायगडावरील सिंहासनाला महत्व आहे असं नाही. किल्ले रायगडावरील हे सिंहासन मराठा साम्राज्याचं तख्त होतं. मराठा साम्राज्याची निशाणी म्हणून या तख्ताची ओळख होती त्या तख्ताचं काय झालं? ते तख्त साडेतीनशे वर्षानंतरही अस्तित्वात आहे का याचा शोध घेण्याचा हा प्रपंच होता. या निमित्तानं सिंहासनाच्या शोधाला चालना मिळावी ही अपेक्षा.