मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर 'फिर हेरा फेरी'चा रियल सीन! बॅगभरुन खेळण्यातील नोटा देऊन 50 लाखांचा गंडा

अंधेरी रेल्वस्थानकात बॅगभरुन खेळण्यातील नोटा देऊन 50 लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. पोलिसांनी बॅग तपासली तेव्हानोटा पाहून आरोपीकडे नोटांची मागणी केली, मात्र,  बनावट नोटा दिसून आल्यानंतर पोलिसांनीच काढता पाय घेतल्याचा दावा केला जात आहे.   

वनिता कांबळे | Updated: Feb 15, 2025, 06:07 PM IST
मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर 'फिर हेरा फेरी'चा रियल सीन! बॅगभरुन खेळण्यातील नोटा देऊन 50 लाखांचा गंडा

Mumbai Crime News : बॉलीवुडचा 'फिर हेरा फेरी' हा कॉमेडी चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. यातील एका सिनप्रमाणे खरोखरचा किस्सा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर घडला आहे. एका व्यक्तीला बॅगभरुन खेळण्यातील नोटा देऊन 50 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. नेहमी प्रवाशांची गर्दी असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकात हा फसवणुकीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

अंधेरी रेल्वे स्थानकात तीन आरोपींनी एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केली. 50 लाख रुपयांऐवजी खेळण्यातील नोटा संबंधित व्यक्तीला दिल्याचं समोर आलं. आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र, चौकशी दरम्याम आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. 

4 फेब्रुवारी रोजी अंधेरी स्थानकात हा प्रकार घडला. आरोपी एका बॅगेतून 50 लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटा घेऊन आले. या वेळी कर्तव्यावरील दोन रेल्वे पोलिसांनी आरोपीची बॅग उघडली असता, त्यात मोठ्या संख्येने 500 रुपयांच्या नोटा आढळल्या. नोटांच्या प्रत्येक बंडलच्या वर असली आणि आतमध्ये खेळण्यातील बनावट नोटा होत्या.   या प्रकरणात अंधेरी रेल्वे पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडताना निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला जात आहे.अंधेरी स्थानकात संबंधित व्यक्तीच्या बॅगेची रेल्वे पोलिसांनी तपासणी  केली. या वेळी बॅगेत लाखो रुपये असल्याचे समजताच महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी संबंधिताकडे पैशाची मागणी केली. मात्र, तपासणीत खेळण्यातील नोटा असल्याचे समजताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी मिळेपर्यंत गुन्ह्याची उकल होणार नाही. आरोपींशी संबंधित दोन व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तसेच रेल्वे पोलिसांनी बॅगेची तपासणी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले.  या प्रकारात रोख रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तुम्ही जेवढे पैसे आणाल, त्याच्या दुप्पट पैसे दिले जातील, असे आरोपींनी तक्रारदाराला सांगितले. या आमिषाला तक्रारदार बळी पडले.