'छावा' पाहून माजी क्रिकेटपटूचा सवाल, म्हणाला, "शाळेत का शिकवला नाही संभाजी महाराजांचा इतिहास?"

विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा 'छावा' चित्रपटाच्या यशाबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटावर बरेचजण आपले मत व्यक्त करत आहेत आणि कौतुक करत आहेत. अशातच, माजी क्रिकेटपटूने हा चित्रपट पाहून त्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले आणि त्यासंबंधीचे काही प्रश्न मांडले. 

Updated: Feb 19, 2025, 11:37 AM IST
'छावा' पाहून माजी क्रिकेटपटूचा सवाल, म्हणाला, "शाळेत का शिकवला नाही संभाजी महाराजांचा इतिहास?"

Aakash Chopra on Chhava Movie: विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय होता आणि प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर बऱ्याच चित्रपटांना मागे टाकत गडगंज कमाई करणारा हा चित्रपट आता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरत आहे. यामध्ये विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेचे तर प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत आणि सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 

माजी क्रिकेटपटूचा सवाल

फक्त सर्वसामान्य प्रेक्षक वर्गच नव्हे तर सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. अशातच, माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यानेसुद्धा हा चित्रपट पाहून त्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. त्याने या चित्रपटाचे कौतुक तर केलेच पण, त्यासंबंधी काही प्रश्नदेखील उपस्थित केले. 

आकाश चोप्राचे प्रश्न

आकाश चोप्राने महाराजांबद्दल विचारलेल्या प्रश्नामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत असल्याची दिसत आहे. त्याने या चित्रपटाबद्दल आपले मत मांडताना एक्सवर पोस्ट केली आणि म्हटले, "मी छावा चित्रपट पाहिला. चित्रपटातील शौर्य आणि अतुलनीय पराक्रम तसेच, स्वराज्याप्रती कर्तव्य दाखविताना ज्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. खरंतर, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला गेला?”

 

असा प्रश्न व्यक्त करत आकाश चोप्राने पुढे लिहिले, "छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासच, नाहीच नाही तर साधा उल्लेखही शाळेतील इतिहासाच्या अभ्यासात कुठे नाही. आपल्याला अकबर कसा मोठा आणि न्यायप्रिय राजा होता, हे शिकवले गेले. इतकेच नाही तर, राजधानी दिल्लीत एका प्रमुख रस्त्याचे नाव औरंगजेब असे आहे. हे सर्व का आणि कसे घडले?”

हे ही वाचा: Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'

 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आकाश चोप्राने महाराजांबद्दलच्या इतिहासाबाबत व्यक्त केलेल्या मतावर एक्सवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका नेटकऱ्याने आकाश चोप्रावर थेट टीका केली आहे. त्याने लिहिले, “तू क्रिकेटर म्हणून अपयशी होतासच, पण आता तू इतिहासातही नापास झालेला दिसतोस” नेटकऱ्याच्या या कमेंटवर आकाश चोप्रा उत्तर देत म्हणाले, “बारावीला मी माझ्या शाळेतून पहिला आलो होतो, इतिहासात मला 80 टक्के गुण होते. धन्यवाद..” काही नेटकऱ्यांनी आकाश चोप्राच्या या प्रश्नांना सहमती दर्शवली तर काहींनी त्यांना धार्मिक वादात न पडण्याचा सल्ला दिला.