Badlapur Metro: बदलापूरहून मुंबईत येण्यासाठी लोकल आणि रस्ते मार्गाने खूप वेळ लागलो. बदलापूरहून लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. कारण म्हणजे लोकलची गर्दी. सकाळी लोकलमध्ये कमालीची गर्दी असते. मात्र लवकरच मुंबईकरांची या गर्दीतून सुटका होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बदलापूर मेट्रो आणि उल्हासनगर पाणी प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हास नदी खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध असून, या ठिकाणी नवीन धरण उभारण्याबाबत व नदीतील गाळ काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. बदलापूरच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन निर्णय घेणार आहे. तसेच, बदलापूरपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कांजूरमार्ग ते बदलापूर असा मेट्रो प्रकल्प होत आहे. मेट्रो 14 या प्रकल्पामुळं अंबरनाथ-बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडला जाणार आहे. मेट्रो 14 हा मार्ग बदलापूर महापे कांजूरमार्ग या 45 किमी लांबीच्या थेट कामकाजासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मेट्रो 14 मार्गावर बदलापूर, अंबरनाथ, निकाळजे, शिळफाटा, महापे, घणसोली या परिसरातून ठाणे, खाडी पूल, ओलांडून कांजूरमार्ग असा मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
45 किमी मेट्रो मार्गावर दोन्ही थांब्यांवरून प्रत्येकी 15 स्थानके, 13 उन्नत स्थानके आणि 1 भूमिगत स्टेशन असतील. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो 4, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जातील