Chhaava Box Office Collection: विक्की कौशलचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. एकाच आठवड्यात सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सिनेमाची लोकप्रियता पाहता हा चित्रपट 2025मधील ब्लॉकबस्टर ठरू शकतो. फक्त चार दिवसांतच चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि पाचव्या दिवशीही म्हणजेच मंगळवारी कमाईचा आलेख वाढला आहे.
साधारणतः शुक्रवारी एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोमवारपर्यंत चित्रपटगृहात त्याला कमी प्रतिसाद मिळतो. मात्र छावाने हा रेकॉर्डदेखील मोडीत काढला आहे. सोमवारीही सिनेमाने कोट्यवधी रुपये कमावले आहे. तर, पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारीदेखील 24.30 कोटी कमावून या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
सैकनिल्क रिपोर्टनुसार, 'छावा'ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 24.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर सिनेमाची एकूण कमाई आता 165 कोटी इतकी झाली आहे. फक्त देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात छावाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं आत्तापर्यंत सिनेमाने 230 कोटींचा आकडा पार केला आहे. 2025मधील आत्तापर्यंत सर्वाधीक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' सिनेरसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. पहिल्याच आठवड्यात चित्रपट 200 कोटींचा आकडा पार करु शकतो. तसंच, या सिनेमा अभिनेता विकी कौशलच्या करिअरसाठीही महत्त्वपूर्ण ठरला आहे. विकी कौशलचा सर्वात पहिला हिट सिनेमा उरी द सर्जिकल स्ट्राइकच्या लाइफटाइम कलेक्शन (245.36)चा आकडादेखील लवकरच पार करु शकतो यात शंका नाही.
छावा सिनेमात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगितली आहे. चित्रपटात धमाकेदार अॅक्शन आणि VFX पाहायला मिळत आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या दिवसांत सिनेमाला आणखी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण लवकरच छावा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होऊ शकतो, तसे संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा" चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.