MHADA Lottery 2024 : स्वप्नाच्या घरासाठी अनेकजण जीवाचा आटापिटा करत असतात. अनेकदा हे स्वप्न नकळतपणे फार सहजगत्या साध्य होतं. पण, कैकदा त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अशीच प्रतीक्षा सध्या खऱ्या अर्थानं फळली असं म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असणारे अर्जदार सध्या म्हणत आहेत. कारण, सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता या अर्जदारांना त्यांचं हक्काचं घर मिळालं आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये म्हाडानं 2030 घरांची सोडत काढली. ज्यानंतर या सोडतीतील विजेत्यांची नावंही जाहीर करण्यात आली. पण, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या सोडतीमधील जवळपास 442 विजेत्यांनी विविध कारणात्सव त्यांच्या घरांचा ताबा सोडला. अर्थात ती घरं म्हाडाकडेच सरेंडर केली.
अर्ज सोजडत प्रक्रियेतून सरेंडर झालेल्या याच घरांपैकी 406 घरं आता या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादी (Waiting List) मध्ये असणाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांना या प्रक्रियेत विजेते गणत म्हाडानं नुकतीच या अर्जदारांना स्वीकृती पत्रही पाठवली आहेत. सदर घरांच्या स्वीकृतीसाठी म्हडानं 15 दिवसांची मुदतही दिली आहे.
म्हाडानं काढलेल्या 2030 घरांच्या सोडतीमध्ये 13 घरांना अल्प प्रतिसाद मिळाला. तर, सोडतीतील जवळपास 442 जणांनी एकाहून अधिक घरांसाठी नावं जाहीर होणं, डोमेसाईल प्रमाणपत्र नसणं या आणि अशा कारणांनी घरं सरेंडर केली. परिणामी यापैरी 406 घरं आता प्रतीक्षा यादीत नावं असणाऱ्यांच्या वाट्याला गेली असून, या अर्जदारांसाठी खऱ्या अर्थानं ही लॉटरीच ठरत आहे. अर्जदारांच्या नावे घरं जाहीर झाल्यानंतर आता पुढील 15 दिवसांमध्ये अॅप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून यासंदर्भातील स्वीकृतीसंदर्भात माहिती देणं अर्जदारांसाठी बंधनकारक असेल.