रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 11, 2025, 07:27 AM IST
रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या title=
Mumbai local train updates Central and western Railway to operate mega block on Sunday check timetable

Mumbai Local Train Update: मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही मेल, एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. तर काही एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकचा लोकलवर काय परिणाम होणार, हे जाणून घेऊया. 

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं अवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. मेगाब्लॉकच्या काळात कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक जाणून घ्या. 

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणेदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकावर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

मेगाब्लॉकच्या काळात अप आणि डाउन मेल, एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे जलद मार्गावर आणि विद्याविहार स्थानकावर डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळं लोकल 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावतील. 

ट्रान्स हार्बर

अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

वाशीयेथून सकाळी 10.25 वा नेरूळयेथून संध्याकाळी 4.09 वाजता ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलच्या दिशेने डाउन ट्रान्स हार्बर सेवा रद्द राहतील. 

कर्जत स्थानकावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 13.50 ते 15.35 वाजता म्हणजेच 1 तास 45 मिनिटे ब्लॉकचा कालावधी असणार आहे.या कालावधीत बदलापूर-खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉकदरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधल्या मार्गांवर कामे करण्यात येणार आहेत. दुपारी १२.२० वाजता सीएसएमटी-खोपोली लोकल आणि दुपारी १.१९ वाजता सीएसएमटी- कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवली जाईल. दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंत धावेल. दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल आणि दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली-सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून सुटेल. दुपारी ३.२६ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुरू होईल.

पश्चिम रेल्वे मुंबई विभाग 

ब्लॉक विभाग : सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
वेळ : स. १० ते दुपारी ३ (पाच तास) 
परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. काही अंधेरी आणि बोरिवली ट्रेन गोरेगावपर्यंत चालविण्यात येतील.