Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मुंबई शहर ते उपनगरापर्यंत लोकलचा विस्तार झाला आहे. प्रवाशांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळं लोकलमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई लोकलचे प्रामुख्याने तिन विभाग आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वे प्रवाशांचा अधिक भार उचलते. तर, काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेवरही गर्दी वाढत आहे. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे नेहमी वक्तशीर का असते? याचे उत्तर आज जाणून घेऊया.
मध्य रेल्वेवर नेहमीच लोकलचा खोळंबा होत असतो. ऐन गर्दीच्या वेळी किंवा ऑफिसला निघण्याच्या वेळेतच लोकल विस्कळीत होते. अनेकदा सकाळी लोकल उशिराने धावत असतात. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल उशिराने धावत असल्याने टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, या तुलनेत पश्चिम रेल्वेवर लोकल अधिक वक्तशीर असतात? त्याचे कारण काय जाणून घेऊया.
पश्चिम रेल्वेचे उपनगरीय जाळे 183.76 किलोमीटर असून या मार्गावर दर दोन किमीवर लोकल गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळं लोकल वेळेत स्थानकात येतात. तसंच, लोकांनाही वेळेवर पोहोचण्याचा मोठा फायदा होता. तसंच, पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर अधिक लोकल फेऱ्या धावतात. पश्चिम रेल्वेवर 1,406 लोकल फेऱ्या धावतात तर मध्य रेल्वेवर 1,810 लोकल फेऱ्या चालतात.
मुंबईत सर्वाधिक प्रवाशांचा भार मध्य रेल्वे उचलते. मध्य रेल्वेवर पाच उपमार्ग असून पश्चिम रेल्वेपेक्षा अधिक सेवा पुरवते.
लोकलचा विस्तार होत असताना प्रवासी संख्येत मात्र घट झाल्याचे पाहायला मिळतेय. कोरोना काळानंतर प्रवासी संख्या 74 लाखांवरुन 68 लाखांवर आली आहे. मात्र प्रवासी संख्या जरी कमी होत असली तरी लोकलची गर्दी मात्र कायम आहे. पश्चिम रेल्वेवर प्रतिदिवस 26.6 लाख प्रवासी दररोज आणि मध्य रेल्वेवर 35.36 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात.