मुंबई-गोवा क्रुझ फक्त जुगार खेळणाऱ्यांसाठी- निलेश राणे

कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी क्रुझ

Updated: Oct 23, 2018, 07:28 AM IST
 मुंबई-गोवा क्रुझ फक्त जुगार खेळणाऱ्यांसाठी- निलेश राणे title=

मुंबई: मुंबई-गोवा असा सागरी प्रवास करणाऱ्या बहुचर्चित आंग्रिया क्रुझच्या मुद्द्यावरून खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. ही क्रुझ सेवा सामान्य जनतेसाठी नसून केवळ जुगार खेळणाऱ्यांसाठी असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे. 
 
 निलेश राणे यांनी ट्विट करून या क्रुझ सेवेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंबई गोवा करणारी अंग्रिया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे??? कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी क्रुझ ही फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यासाठी आहे, असे वाटते. मध्यमवर्गीय जनता आणि पर्यटकांच्यादृष्टीने या क्रुझचा उपयोग शून्य आहे, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 
 मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवेचे शनिवारी मोठ्या थाटात उद्घाटन झाले. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास होणार आहे. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आकारण्यात येणार आहे. चार ते चौदा व्यक्तींच्या कुटुंबासह जोडप्यांसाठी खास खोल्यांची सुविधा क्रूझमध्ये करण्यात आली आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. खोल्यांच्या निवडीनुसार प्रवास खर्च आकारला जाईल. शिवाय डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष अशा सुविधा क्रूझवर आहेत.