'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा

Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण...   

सायली पाटील | Updated: Jan 29, 2025, 01:01 PM IST
'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा  title=
bollywood Actress Dia Mirza urges CM Devendra Fadnavis over air pollution in Mumbai

Dia Mirza on Mumbai air pollution: अभिनय क्षेत्रासमवेत पर्यावरण आणि सामाजिक कार्यामध्ये हिरीरिनं पुढाकार घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री दिया मिर्झाच्याही नावाचा समावेश होतो. याच दिया मिर्झानं आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच आपली आणि शहरातील समस्त माता, भगिनी, नागरिकांच्या वतीनं एक व्यथा मांडली. 

दियाची हतबलता तिनं लिहिलेल्या पोस्टमधून व्यक्त होत झाली. दियानं X च्या माध्यमातून लिहिलेल्या तिच्या सोशल मीडिया पोस्टला अनेक लाईक आणि रिशेअर मिळाले. तर, तिनं मांडलेल्या व्यथेशी सहमत होत परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे याच मुद्द्याला नेटकऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला. 

'एक आई म्हणून  मी आवाहन करतेय की...'

मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की सामान्यांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. याच मुद्द्याकडे दियानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. तिनं लिहिलं, 'मुख्यमंत्री फडणवीसजी, मुंबई आणि महाराष्ट्रातील वायू प्रदूषणामुळं आमच्या मुलाबाळांच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मी एक आई म्हणून तुम्हाला विनंती आणि आवाहन करते की कृपा करून तातडीनं या मुद्द्यावर लक्ष द्या. ही एका पालकानं केलेली कळकळीची विनंती आहे..'

हेसुद्धा वाचा : Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? नागरिकांनो या बातमीकडे अजिबात दुर्लक्ष नको 

आपल्या या विनंतीपर आवाहनासोबत दियानं मुंबईचा एक नकाशाही जोडला. जिथं. शहरातील हवेचा गुणवत्ता निदेशांक अर्थात AQI किती घसरला आहे हे स्पष्ट पाहता येत आहे. दियाची ही पोस्ट सोशल मीडियामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत असून, फक्त दियाच नव्हे, तर समस्त मुंबईकरांची हीच मागणी असल्याचं आता स्पष्ट होत आहे. यंत्रणा यावर आता काय निर्णय आणि कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.