BJP DCM Eknath Shinde Head To Head? राज्यामध्ये अभूतपूर्व बहुमताने निवडून आलेल्या महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असतानाच आता थेट शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीकडून आव्हान देण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातही हे आव्हान थेट शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात देण्यात आलं आहे. शिंदे ज्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार आहेत तिथेच भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार भरवणार असल्याने या मुद्द्यावरुन दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गणेश नाईक हे ठाणे शहरात जनता दरबार भरवणार असून त्यांनी यासाठी कोपरीची निवड केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोपरीत येऊन गणेश नाईक यांनी त्यांना एकप्रकारे अप्रत्यक्ष आव्हान दिले असल्याची कुजबुज यानिमित्ताने होऊ लागली आहे. महत्वाचे म्हणजे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीकरता तयार राहा असा सल्ला ही त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. ठाणे ही शिवसेनेनं जिंकलेली पहिली महानगरपालिका असल्याने बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं. या पहिल्या विजयापासून ठाण्यामध्ये शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे. त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणेकरही शिंदेंच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसून आलं. शिंदे मुख्यमंत्री झाल्याने राजकीय वर्तुळात ठाण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. ठाणे हे राज्यातील राजकीय घडामोडींचं मुख्य केंद्र झालं आहे.
ठाण्यामधील जनता दरबादारामध्ये आपण कार्यकर्त्याना सांगितले होते की कुणाचाही अपप्रचार किंवा कुणाविरुद्धही अनुदगार काढायचे नाहीत. केवळ आपण काय करणार याचाच प्रचार आम्ही केला असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. महापालिका निवडणुका कधी जाहीर होतील माहित नाही, पण कामाला लागा असा आदेश ही नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. पूर्वी ओन्ली विमल म्हटले जायचे पण आता फक्त ओन्ली कमळ आहे, असंही नाईक यांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना म्हटलं.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातील 9500000000000 रुपयांचे प्रकल्प केंद्राने...; पुण्यातील 'त्या' Video वरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना, 'पक्षाने मला ठाण्याची जबाबदारी दिली आहे. ठाणे सुरळीत करण्याचे काम आपले असल्याचे नाईक यांनी सांगितले. दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, त्यामुळे सकारात्मक राहून जगा असा टोला नाईक यांनी थेट कोणाचंही नाव न घेता लगावला.
नक्की वाचा >> '...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर
पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवायचे. तेव्हा, लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा 'जनता दरबार ' भरवणार असल्याची घोषणाही गणेश नाईक यांनी भाषणात केली.
दरम्यान, नाईक यांच्यावर पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असताना त्यांनी ठाण्यात जनता दरबार भरवण्याची घोषणा करून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता ठाण्याच्या राजकीय वर्तुळात यनिमित्ताने होत आहे.