राम शिंदेसह, दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामीनावर बाहेर आल्यानंतर ओबीसी समाजाचे राजकारण आता तापू लागलं आहे. भाजपा सरकारच्या काळात ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा सूर आता निघत आहे. हा सूर विरोधकच नव्हे तर भाजपातील ज्येष्ठ नेते सुद्धा काढताना दिसतायत. राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज भाजपाविरोधात संघटीत झाला तर ते भाजपाला महागात पडू शकते.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं हे विधान भाजपाला चांगलंच अडचणीत आणणारं ठरू शकतं. भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी केलाय.
भाजपातील ओबीसींचा चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना केंद्रातील मंत्रीपदासाठी झगडावं लागलं होतं. तर आता त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनाही राज्य मंत्रीमंडळात अनेक बाबतीत डावललं जात असल्याची चर्चा होती. आता खडसेंनी त्याला जणू दुजोराच दिलाय. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसीच असल्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला असे म्हणता येणार नसल्याची सारवासारव भाजप मंत्र्यांनी केलीय.
एकनाथ खडसेंवर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्यात आला, मात्र हा न्याय इतर मंत्र्यांना लावला गेला नाही. खडसे अडचणीत येतील अशा हालचाली पक्षातूनच सातत्याने केल्या गेल्या, त्यामुळे खडसे चांगलेच दुखावले गेले आहेत. दुखावलेल्या खडसेंनी आता ओबीसींच्या लढ्यासाठी थेट छगन भुजबळांना साथ देण्याचीच घोषणा केली आहे.
दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वी देशपातळीवर ओबीसींचे नेता म्हणून छगन भुजबळ उदयास येत होते. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी महाराष्ट्रात ओबीसींचं संघटन उभं केलंच. याशिवाय दिल्ली, बिहार या ठिकाणी ओबीसींचे मोठे मेळावे घेऊन त्यांनी आपलं नेतृत्व देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. यात भुजबळ यांना बऱ्यापैकी यशही आलं होतं. देशपातळीवरील ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ आपलं स्थान निर्माण करत होते. ही भरारी घेत असतानाच सव्वा दोन वर्षांपूर्वी भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटक झाली. आता भुजबळ तुरुंगातून बाहेर आलेत, निश्चितच आता ते पुन्हा समता परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर ओबीसींचं संघटन करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार.. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून ओबीसींवर अन्याय सुरू झाला असून भुजबळांची अटक हा त्याचाच एक भाग असल्याचा प्रचार आता केला जातोय. स्वतः भुजबळही ओबीसींना आपल्या मागे संघटित करण्यासाठी ओबीसींवरील अन्यायाचा मुद्दा पुढे करत आहेत. तर शरद पवारांनीही फुल्यांचं पागोटं भुजबळांच्या डोक्यावर ठेवून जो संदेश द्यायचा तो बरोबर दिला आहे.
ओबीसींवरील अन्यायाचा मुद्दा आता तापवला जात आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या ४० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकद या समाजात आहे. ओबीसी अन्यायाच्या मुद्यावर छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज भाजपाविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला एकनाथ खडसेंची साथ लाभली तर ती भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकेल.