फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह, कंबरेवरील भाग गायब; शेजारीच काळी बाहुली अन्...

Shocking News: पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर वेगवेगळ्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 18, 2025, 09:09 AM IST
फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह, कंबरेवरील भाग गायब; शेजारीच काळी बाहुली अन्... title=
या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे

Shocking News: साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फलटणमधील विडणी येथे उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार हा जादूटोण्याचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

अंधश्रद्धेतून नरबळी?

मिळालेल्या माहितीनुसार, विडणीमधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात महिलाच्या मृतदेहाचा कंबरेखालील भाग आढळून आला. या मृतदेहाच्या बाजूला गुलाला, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. विडणी 25 फाटा येथे प्रादी जाधव यांचं ऊसाचं शेत आहे. या निर्मनुष्य ठिकाणी 4 ते 5 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या अज्ञात महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकून पळ काढला. 

आधी कोणाला आणि कधी दिसला हा मृतदेह?

या महिलेचा कंबरेखालील भाग असलेला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतीतल मृतदेह जंगली प्राण्याने उसाच्या शेतातून ओढळून बाहेर काढला. हा मृतदेह शेतमालक प्रदीप जाधव यांनी सर्वातआधी शेताच्या बांधावर पाहिला. त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहीत तपासासाठी वेगवेगळ्या तुकड्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा केला. ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्याच्या उद्देशाने प्रदीप शेतातून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने पहाणीसाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. 

अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित

या मृतदेहपासून काही अंतरावर नारळ, गुलाला, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता ही महिला कोण आहे? तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली? मृतदेहाचा कंबरेवरील भागाचं काय झालं? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. सध्या संपूर्ण पंचक्रोषीमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा असून वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत.