'तेलगी प्रकरणात माझादेखील...'; भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण! म्हणाले, 'दोषींना...'

Bhujbal On Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 6, 2025, 02:47 PM IST
'तेलगी प्रकरणात माझादेखील...'; भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण! म्हणाले, 'दोषींना...' title=
पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी मांडली भूमिका

Bhujbal On Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरु असतानाच या प्रकरणाशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचा आरोप करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असं असतानाच आता सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि वाल्मिक कराडवर कलम 302 म्हणजेच हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत खटला चालवावा अशा मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं आहे. मात्र एकीकडे अशी मागणी होत असतानाच आता धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत. धनंजय मुंडेंविरोधात अद्याप काहीही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे आधीच त्यांचा राजीनामा घेणं आपल्याला पटत नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. मुंबईमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

राजीनाम्यावर काय म्हणाले भुजबळ?

बीड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्याऐवजी मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या छगन भुजबळांना संधी दिली जावी अशी मागणी समर्थकांकडून केली जात असतानाच छगन भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "कोणाचा तरी मंत्रिपद काढून मला मला द्या, असा विचार माझ्या मनात देखील येणार नाही," असं भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना, "आका की काका जे कोणी असतील ते जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात येणार. त्याच्या आधीच त्यांनी (धनंजय मुंडेंनी) राजीनामा का द्यावा?" असा सवाल भुजबळांनी विचारला आहे. 

माझा सुद्धा राजीनामा घेण्यात आला होता पण...

"अशाच एका प्रकरणातून मी सुद्धा गेलो आहे. तेलगी प्रकरणात माझादेखील राजीनामा घेण्यात आला. माझं नाव कुठेच नव्हतं. चार्जशीटमध्येही कुठेही माझे ना आले नाही. पण माझे पद मात्र गेले. नंतर निवडूण आल्यानंतर मला मंत्रीपद देण्यात आले. अशा रीतीने त्यांचा (धनंजय मुंडेंचा) राजीनामा मागणे हे मला योग्य वाटतं नाही," असं भुजबळ म्हणाले. विधीमंडळामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येची घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे आल्याचं भुजबळ म्हणाले. "दोषींवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. प्रकरण एकूण अंगावर शहारे येतात. दोषींना फाशीच झाली पाहिजे," असं भुजबळ म्हणाले. 

नक्की वाचा >> '...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख

हे आम्हाला काय माहिती?

"जरांगे पाटील हे जे बोलत आहे ते योग्य नाही. ही लोकशाही आहे ठोकशाही नाही. एकही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये," असंही भुजबळ म्हणाले. "बीडमधील तपासाच्या एसआयटीमध्ये जे अधिकारी होते हे त्यांचे मित्र आहेत. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले. आमच्यासोबत अनेक कार्यकर्ते फोटो काढतात. आता हे कार्यकर्ते कोण आहेत हे आम्हाला काय माहिती?" असा सवाल भुजबळांनी केला. "अंजली दमानिया यांना ज्या लोकांनी धमकी दिली त्यांचे नंबर पोलिसांना दिले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे," असं भुजबळ म्हणाले. 

भेटीत राजकीय चर्चा नाही

मागील काही दिवसांमध्ये छगन भुजबळ वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त मोठ्या नेत्यांबरोबर एकाच मंचावर दिसून आले. त्यासंदर्भात त्यांना विचारलं असता, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो, नायगाव मोठा कार्यक्रम होता. तिथे विकास काम करण्यासाठी ऑर्डर देखील देण्यात आली आहे. त्याच दिवशी चाकणमध्ये पर्णकुटी पुतळ्याचे उद्घाटन देखील होत त्या ठिकाणी पवार साहेबांनी मला बोलावले. या दोन्ही भेटींदरम्यान कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत," असं स्पष्ट केलं.