फरार आरोपी कृष्णा आंधळेला कोण पाठीशी घालंतय? नक्की कुठे गायब झालाय? जाणून घ्या!

Beed Crime:  आतापर्यंत 8 आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत. मात्र नववा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2025, 08:19 PM IST
फरार आरोपी कृष्णा आंधळेला कोण पाठीशी घालंतय? नक्की कुठे गायब झालाय? जाणून घ्या! title=
कृष्णा आंधळे

Beed Crime: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 55 दिवस झालेत. मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. पोलीस, सीआयडी सारख्या यंत्रणा कृष्णा आंधळेचा शोध घेताहेत. तर एसआयटी या सर्व प्रकरणाचा तपास घेताहेत.. एवढ्या यंत्रणांना कृष्णा आंधळेनं गुंगारा दिलाय. आता आंधळेच्या फरार होण्यावरून आरोप प्रत्यारोपंच्या फैरी सुरू झालेत. 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 55 दिवस पूर्ण झालेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत. मात्र नववा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.पोलीस, सीआयडी आणि एसआयटी सारख्या यंत्रणांनाही आंधळेला शोधण्यात यश आलेलं नाहीय. त्यामुळे आरोपी कृष्णा आंधळेचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय..कृष्णाच्या गायब होण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संशय उपस्थित केलाय.

फरार कृष्णा आंधळेने पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार प्रशासन असेल असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. तर आरोपी विष्णू चाटेचा फोन सापडत नाही.. त्यामध्ये ही पुरावे असतील याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन धनंजय देशमुख यांनी केलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेचा सगळ्या पुरवठा होत असेल किंवा तो असेल की नाही याबाबत सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित केलीय. कृष्णा आंधळे कितीही पळाला तरी पोलिसांच्या पकडच्या बाहेर जाऊ शकत नसल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय.

कृष्णा आंधळेला कोण मदत करतंय हा मागील 55 दिवसांपासून उपस्थित होत असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.. मात्र या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणांना 55 दिवसांमध्ये कृष्णा आंधळे कसा सापडत नाहीय हा प्रश्न अनेकांना पडलाय. आता कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी यंत्रणा नवीन काय शक्कल लढवतील यापेक्षा कृष्णा आंधळे आता नक्की कुठे गायब झालाय हा प्रश्न सर्वाधीक र्चेचा ठरतोय.

भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार 

धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्यावरुन महंत नामदेवशास्त्री टीकेचे धनी ठरले होते. धनंजय मुंडेंना भगवानगडानं पाठिंबा देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रचंड नाराज झाल्यात. लाभाच्या पदाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाले त्यांना पाठिंबा देणं योग्य नसल्याचं दमानिया म्हणाल्यात. भगवानगडानं म्हणजेच नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागं घ्यावा असं आवाहन अंजली दमानियांनी केलंय. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहण्याची नैतिकता गमावल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. येत्या काळात ज्या भगवानगडानं धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता. तोच भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.