'भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल', अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं भाकीत

आपण धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार असून ते पुरावे पाहून भगवानगडच मुंडेंचा राजीनामा मागेल असं दमानिया म्हणाल्या आहेत. 

पुजा पवार | Updated: Feb 3, 2025, 08:04 PM IST
'भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल', अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं भाकीत title=
(Photo Credit : Social Media)

सीमा आढे, मुंबई : धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारा भगवानगडच त्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर राजीनामा मागेल असं भाकीत सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानियांनी केलं आहे. धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन भगवानगडावर जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. आपण भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार असून ते पुरावे पाहून भगवानगडच मुंडेंचा राजीनामा मागेल असं दमानिया म्हणाल्यात. 

धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्यावरून महंत नामदेवशास्त्री टीकेचे धनी ठरले होते. धनंजय मुंडेंना भगवानगडानं पाठिंबा देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रचंड नाराज झाल्यात. लाभाच्या पदाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाले त्यांना पाठिंबा देणं योग्य नसल्याचं दमानिया म्हणाल्यात. भगवानगडानं म्हणजेच नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागं घ्यावा असं आवाहन अंजली दमानियांनी केलं आहे.

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहण्याची नैतिकता गमावल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. येत्या काळात ज्या भगवानगडानं धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता. तोच भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भगवानगड हे समाजाचं श्रद्धास्थान आहे. शिवाय नैतिकतेचं अधिष्ठान आहे. त्यामुळं भगवानगड धनंजय मुंडेंकडे राजीनामा मागणार असं कोणतं प्रकरण अंजली दमानिया उघड करणार याबाबत उत्सुकता राजकीय विश्वात निर्माण झालीये.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाने देखील दिली भगवानगडाला भेट : 

बीडमधील भगवानगडाचे महंत नमादेव शास्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केल्यावर, सोमवारी सरपंच संतोष देशमुखांचे नातेवाईक आज महंत नामदेव शास्रींची भेट घेण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पुरावे दाखवण्यासाठी पोहोचले होते. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याची फाईल घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भगवानगडावर दाखल झाले होते.