मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान?

Grid Of Expressways in Maharashtra : मुंबई गोवा महामार्ग,  नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग हे तीन मोठे माहामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. जाणून घेऊया सरकारची योजना. 

वनिता कांबळे | Updated: Feb 3, 2025, 11:15 PM IST
मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान? title=

Mumbai-Goa Konkan  Expressway will connect to the Samruddhi Expressway : महाराष्ट्रतील तीन सर्वात मोठे महामार्ग जोडून महाराष्ट्रात ग्रीड एक्सप्रेस वे बनवण्याचा प्लान आहे. यासाठी मुंबई गोवा महामार्ग,  नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग हे तीन मोठे माहामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. 

प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा कोकण द्रुतगती महामार्गासह मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग राज्याच्या विभिन्न टोकाला एकमेकांशी जोडणार आहेत.  एक्स्प्रेसवे या 3 मुख्य द्रुतगती मार्गांना जोडून महाराष्ट्रात द्रुतगती मार्गांचा ग्रिड तयार केला जाणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरु होणार आहे,.  

कोकण द्रुतगती मार्गाचे काम लांबणीवर जाणार आहे. एमएसआरडीसीने या महामार्गाचा सुधारित डीपीआर  तयार केला असून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी  हा प्रलंबित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर या एक्स्प्रेस वेसाठीही भूसंपादन सुरू होणार आहे.

मुंबई-गोवा हायवेचे काम तब्बल 12  वर्षापासून रखडलं

मुंबई गोवा महामार्ग महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मात्र, मुंबई-गोवा हायवेचे काम तब्बल 12  वर्षापासून रखडल आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. 466 किमीच्या रस्त्याचं रुंदीकरण पुढच्या 5 महिन्यांत होणं अपेक्षीत आहे. या रस्त्याचं काम झाल्यानंतर केवळ 6 तासात मुंबईहून गोवा गाठता येणारेय. त्यात 41 बोगदे आणि 21 पूल उभारले जाणार आहेत.

शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प

नागपूर ते गोवा या  शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारनं हिरवा कंदिल दिलाय.. आणि हा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठीचा पाठवण्यात आला आहे. नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 तास लागतात. तोच प्रवास शक्तिपीठ महामार्गाने 8 तासांत शक्य होणार आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. 802 किलोमीटरचा प्रस्तावित रस्ता.. 86 हजार कोटी खर्च. 27 हजार एकर जमिन संपादित केली जाणार आहे.  सेवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड, ओंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औंदुबरचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी ही देवस्थानं या महामार्गाने जोडली जाणार आहेत.

मुंबई  नागपूर प्रवास 8 तासांत

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. यापैकी नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या कार्यान्वित आहे. तर इगतपुरी ते मुंबई हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे. हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर हे अंतर 16 तासांऐवजी अवघ्या 8 तासांमध्ये पार केलं जाणार आहे.