Varsha Bungalow Official Residence of Chief Minister of Maharashtra : महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले. सरकार स्थापन झालं. मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं. मंत्र्यांना बंगले मिळाले. पण महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री अजून त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला आलेले नाहीत. महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र म्हणून वर्षा बंगल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक मोठ्या नेत्याचं वर्षा बंगल्यावर मुक्कामाचं स्वप्नं असतं. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास दोन महिने होत आले पण वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री राहायला आले नाहीत.
वर्षा बंगल्यावरच्या मुक्कामावरुन संजय राऊतांनी वेगळेच आरोप केलेत. वर्षा बंगला पाडून नव्यानं बंगला उभा करणार असल्याची माहिती हाती आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी तर या प्रकरणात ज्यांनी वक्तव्य केलंय ते सगळेच तज्ज्ञ असतील असं सांगून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना शालजोडीतले लगावलेत. भाजपनं हे सगळे आरोप फेटाळलेत.वर्षा बंगल्याच्या नुतनीकरणाचं काम सुरु असल्यामुळं मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर मुक्कामी गेले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय.
वर्षा हे महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राचं प्रतिक आहे. पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांचं वर्षा हेच निवासस्थान नव्हतं. त्यावेळी सह्याद्री हे निवासस्थान होतं. पण कालांतरानं सह्याद्री बंगल्याचं अतिथिगृहात रुपांतर करण्यात आलं. आता संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणं वर्षा बंगल्याचाही पुनर्विकास होणार का?... तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान कोणतं असणार याची उत्सुकता निर्माण झालीय.