Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची देखील यादी भाजपने जाहीर केली आहे.
भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनाही मोठी संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण ही नावे सातत्याने राजकारणात चर्चेत असतात. पण अजित गोपछडे हे नवा अनेकांसाठी नवीन आहे.
कोण आहेत डॉ अजित गोपछडे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.
डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.
महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
गोपछडे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष
भाजपच्या डॉक्टर सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे. पण नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की, त्यांचे नाव मागे गेल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करुन दाखवायचे. गेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. अखेर त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून खासदार म्हणून संधी मिळाली आहे.
सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली.
नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत तर जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार (नायगाव), डॉ. तुषार राठोड (मुखेड), भीमराव केराम (किनवट) हे तीन आमदार आहेत. त्याचबरोबर मागील वेळेस विधानपरिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे चार आमदार आणि एक खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून आणखी एका खासदाराची भर पडणार आहे.