PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. इस्कॉन मंदिराचे उद्घाटन आणि भारतीय नौदलाचे सामर्थ वाढवणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर मोदी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांची भेटदेखील घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत. मुंबईतील नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जातांना आमदारांसाठी विशेष 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानभवनातून या विशेष बस राखीव ठेवण्यात येणार आहे. विधानभवनात चहा नाश्ता झाल्यानंतर महायुतीचे आमदार विधानभवनातून पंतप्रधानांच्या भेटीकरता निघणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल अडीच तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधतील. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल. तसंच, मोबाईल विधानभवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचेही समोर आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख नेत्यांसह महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. तसंच, केंद्र व राज्यातील योजनांच्या अंमलबजावणीबाबतही आमदारांना पंतप्रधान मोदींकडून विचारणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्याच्या विकासासाठी आमदारांची दूरदृष्टी कशी असेल, त्यांचे व्हिजन कसे असेल याची माहिती पंतप्रधानांना द्यावी लागणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून आमदारांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारच्या निर्णयांचा राज्याला काय फायदा झाला, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे 10.30 वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत,आय एन एस निलगिरी व आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 3.30 वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील. यानंतर महायुतीचे मंत्री आणि आमदारांना ते मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देतात याबाबत उत्सुकता आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.