Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना संपवून दाखवावं असं ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
"मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं आमचं म्हणणं होतं. पण झुंडशाहीपुढे नमतं घेण्यात येत आहे. मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्राचे लाखो दाखले देण्याचं काम सुरु आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त यांचं आरक्षण धोक्यात येत असताना आमच्यापुढे पर्याय नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत. लोकशाहीने जे काही अधिकार दिले आहेत ती आयुधं वापरणार आहोत," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगेंना जाहीर आव्हान दिलं. तसंच भारतात त्यांच्याइतका मोठा ज्ञानी नाही असा टोलाही लगावला. "मनोज जरांगे यांच्याइतका ज्ञानी भारतात दुसरं कोणी नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते. त्यांना लाखात, कोटीत फरक कळत नाही. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावं. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
"ते मराठा जातीसाठी लढत आहेत, मी तर संपूर्ण समाजासाठी लढत आहे. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. मंत्रिमंडळ बैठकीत मी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते. त्या अजेंड्यावर हा विषय नव्हता," अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.
"गावागावात गेले तीन दिवस उन्माद उत्सव सुरू झाला आहे. ओबीसींच्या घरासमोर फटाके लावायचे नाचायचे. लोकांना गावे सोडून जावे लागत आहे. जो उन्मादी उत्सव तो ओबीसीच्या विरूद्ध ते आम्ही पाहत आहोत. ही भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. डीजेवर मला शिवीगाळ करणारी गाणी वाजवली जात आहेत," असं छगन भुजबळांनी सांगितलं.