Sharad Pawar Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्वीटरवरुन शरद पवार यांना 'लवकरच तुमचा दाभोलकर होईल' असं ट्विट करुन धमकावण्यात आलं आहे. या प्रकरणी शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.
'राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन' या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,' असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. तर सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्या आजारावरुन टीका केली आहे. सौरभ पिंपळकर हा भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. "आयुष्यभर सुपारी कत्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाचं तोंड मरताना वाकडं होऊन मेल म्हणजे हे खरे आहे का? असे असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार," असं विधान या ट्विटमध्ये करण्यात आलं आहे. या कमेंट्सविरुद्ध तक्रार करण्यात आल्याचे समजते.
सुप्रिया सुळेंनी या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. "मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. कुठल्या तरी अकाऊंटवरुन अशी एक धमकी दिली जात आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याही अशा काही कमेंट्स आल्या आहेत. या कमेंट्स आक्षेपार्ह आहेत. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांपर्यंत कळवला आहे. पवारांबद्दल आलेली धमकी दुर्देवी आहे. राजकारणामध्ये मतभेद नक्की असतात. पण इतका द्वेष पसरवला जातोय, हे फार दुर्देवी आहे," असं सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. यावेळेस त्यांनी या वादग्रस्त ट्वीट्स आणि कमेंट्सचे प्रिंटही प्रसारमाध्यमांना दाखवले.
"हा द्वेष कशासाठी पसरवला जात आहे. मात्र हा कशासाठी पसरवला जातोय? हे गुंडाराज आहे. असं असेल तर याविरुद्ध तातडीने कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या धमकीचा पाठपुरावा करुन जो काय न्याय आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांसाठी सुरक्षेची मागणी केली आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "शरद पवारांची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय आहे. ते देशाचे नेते आहेत. त्याबद्दल गृहमंत्रालयाने लक्ष घालावं. याबद्दल मी काय सांगणार?" असा प्रतिप्रश्न विचारला. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे का असं विचारलं असता, "मी जी धमकी आलीय त्याबद्दल तक्रार केली त्यावर त्यांनी लवकरच कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.