Maharashtra Weather News : देशाच्या उत्रेकडील राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्र वगळता मैदानी भागांमध्येही आता कमाल तापमानावाढ होण्यास सुरुवात झाली आहे. इथं महाराष्ट्रासह दक्षिण आणि मधय भारतातही तापमानवाढीचं सत्र सुरू झाल्याचं चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार जानेवारीप्रमाणे फेब्रुवारीतही मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात तापमानात अचानक मोठी वाढ होऊ शकते. 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' अर्थात पश्चिमी झंझावाताचा परिणाम कमी झाल्याने मुंबईच्या तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळं आता पहाटे पडणारी थंडीसुद्धा दडी मारणार असून, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत.
दरम्यान, मुंबई शहरात पहाटेच्या वेळी कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. मंगळवारी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून, दिवसाही तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत अल्हाददायक वातावरण अनुभवण्याची संधी लोकांना मिळणार आहे. शहरासह उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील, कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहेत.
ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागामध्ये हवामानाचे तालरंग सातत्यानं बदलणं अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या देशात पूर्वेकडील कोरड्या आणि शुष्क वाऱ्यांचा रात्रीच्या वातावरणावर काही प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. राज्यावरही हवामानाच्या या प्रणालीचा परिणाम होत असून, किमान तापमानावर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे.