Chhatrapati Shivaji Maharaj Actor Rahul Solapurkar : अखंड महाराष्ट्रासह देशभरात आपल्या कर्तृत्त्वं आणि सामर्थ्याची गाथा पोहोवणारे छत्रपती शिवाजी महाराज अनेकांच्याच प्रेरणास्थानी आहेत. याच महाराजांविषयी मराठमोळ्या अभिनेत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी म्हंटलंय. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
जेव्हाजेव्हा स्वराज्य, छत्रपतींचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा आग्र्यातील सुटकेचाही उल्लेख होतो. औरंगजेबानं राजांना नजरकैदेत ठेवणं असो, त्यांनी तिथून सुटका करत स्वराज्यात परतण्याचा पराक्रम असो किंवा आणखी काही संदर्भांची नोंद असो. तत्कालीन पुरावे आणि ऐतिहासिक नोंदींच्या बळावर हा प्रसंग खऱ्या अर्थानं डोळ्यांसमोर उभा राहतो. पण, राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानं मात्र आता एकच खळबळ माजली असून, त्यांच्या मते 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले.'
महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटल्याचं सांगताना त्यांनी किती हुंडी वटवला याचेही पुरावे असल्याचं त्यांनी यु ट्यूब चॅनलच्या मुलाखतीदरम्यान सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीरासह त्याच्या बायकोला लाच दिली, मोहसीन का मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही- शिक्का असणारं अधिकृत पत्रही त्यांनी घेतल्याचं सोलापूरकरांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
दरम्यान, सोलापूरकांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता राजकीय स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सोलापूरकर यांच्यावर कडाडून टीका करत सोलापूरकरांना खडे बोल सुनावले. या प्रकरणी आता अभिनेत्यांची काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.