BlackRock Office Space: सुरुवातीपासूनच मुंबई हे शहर व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास आलं आणि या शहराचा सर्वांगीण विकास आजतागायत सुरुच आहे. अशा या शहरात परदेशी गुंतवणूकदारांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत असताना एका लक्षवेधी व्यवहारानं व्यवसाय क्षेत्रात नव्यानं नजरा वळवल्या आहेत.
जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी असणाऱ्या ब्लॅकरॉक या कंपनीनं मुबंईतील गोरेगाव इथं तब्बल 1.65 लाख चौरस फूट इतकी मोठी जागा भाडेतत्त्वावर घेतली असून, हे ऑफिस ब्लॅकरॉकच्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) च्या रुपात इथं सेवा देईल असं सांगण्यात येत आहे. कंपनीची जागतिक स्तरावरील उलाढाल इथूनच होणार असून, दहा वर्षांसाठी हा करार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार ब्लॅकरॉकनं ओबेरॉय रियल्टीच्या Commerz III कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये तीन मजले भाड्यानं घेतले असून, या करारानुसार कंपनी दर महिन्याला 2.6 कोटी रुपये भाडं भरणार आहे. 10 वर्षांच्या करारानुसार ही रक्कम 400 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं. ET च्या वृत्तानुसार या करारान्वये 36 महिन्यांच्या कालावधीत या जागेत 15 टक्क्यांनी भाडेवाढ लागू होणार आहे. याशिवाय प्रारंभिक पाच वर्षांमध्ये कंपनीला ही जागा सोडता येणार नसल्याची अटही करारात नमूद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भारतात या कंपनीकडून करण्यात आलेली इतकी मोठी गुंतवणूक पाहता कंपनी इथं दीर्घकाळासाठी कार्यरत राहील असं म्हटलं जात आहे.
भारतात आणि प्रामुख्यानं मुंबईसारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी कंपनीनं नव्यानं घेतलेली जागा पाहता इथंही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही.
मुंबईत जागा भाड्यानं घेण्याची या कंपनीची पहिलीच वेळ नसून यापूर्वी 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात कंपनीनं वरळी इथं 42,700 चौरस फुटांचं ऑफिस भाड्यानं घेतलं होतं. 2008 मध्ये या कंपनीनं भारतात आपली सेवा देण्यास सुरुवात केली. ही कंपनी म्यूचुअल फंड, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) अशा क्षेत्रांमध्ये सक्रिय असून, मुंबईसह गुरुग्राम, बंगळुरु इथंही या कंपनीनं ऑफिस सुरु केले असून, प्रत्येक दिवसागणिक भारतात व्यवसायाची पकड आणखी भक्कम करण्याकडेच या कंपनीचा कल असल्याचं पाहायला मिळत आहे.