Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ऑगस्टनंतर पाऊस पुनरागमन करेल असा इशारा देण्यात आला होता. आता मात्र हा इशारा खरा ठरला आहे. पावसाने ऑगस्ट अखेर चांगला जोर पकडला आहे. मराठवाडावगळता राज्याच्या इतर भागात दमदार पाऊस सुरू आहे.
राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. बहुतांश भागात जोरदार पावसाने शनिवारी हजेरी लावली होती. पुणे, सातारा घाटमाथ्याला रविवारी रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाडा वगळता गुरुवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत असून त्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळं राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
हवामान विभागाने आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, साताऱ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
आज 25 ऑगस्ट रोजी पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला जातोय. काही वेळात मुठा नदी पात्रात ३१ हजार ५१५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.