गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त

Narhari Zirwal : महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरुच आहे. नाराजीबाबत राष्ट्रवादीचे पालकमंत्री खदखद व्यक्त करण्यात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आवडीचा जिल्हा न मिळाल्यानं नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2025, 06:40 PM IST
गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त title=

Maharashtra Government Guardian Minister : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून सुरू झालेलं शुक्लकाष्ठ अजूनही संपायचं नाव घेत नाहीय. पालकमंत्रीपदातून वगळल्यानं अनेक मंत्री नाराज होते..तर आता आवडीचा जिल्हा न दिल्यानंही नाराजीचा मोठा सूर उमटलाय. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली खदखद बोलून दाखवलीय. गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केल्याचं झिरवाळांनी म्हटलंय.

झिरवाळांनी आपल्या मनातल्या भावनांना वाट करून दिली. मात्र ते अजित पवारांना फारसं रूचलेलं दिसत नाहीय. झिरवाळांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
नरहरी झिरवाळांच्या खदखदीवरून विरोधकांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधलाय. झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान आहे. अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊतांनी केलीये.

आवडीचा जिल्हा मिळाला नाही म्हणून राष्ट्रवादीत एकटे झिरवाळ नाराज नाहीयेत तर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. पालकमंत्रिपदावरून योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलयं.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र, पदाची इच्छा व्यक्त करताना कशा पद्धतीनं व्यक्त करणं महत्त्वाचं असल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी म्हटल आहे.

पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादीतूनच सर्वाधिक नाराजीचा सूर उमटलाय. आपल्याच नेत्यांची नाराजी थोपवणं हे अजित पवारांसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत अजितदादांनी यावर अधिक बोलणं टाळलंय. पालकमंत्रिपदाचं वाटप होऊन बरेच दिवस झालेत. तरीसुद्धा महायुतीतील मंत्र्यांमध्ये सुरु असलेली धुसफूस थांबता थांबेना झालीये. त्यामुळं पालकमंत्रिपदाच्या नाराजीचा तोडगा कसा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे.