Man Dies After Spraying Pesticides: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका विचित्र दुर्घटनेमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतात किटकनाशकं फवारुन आल्यानंतर हात न धुतल्याने विषबाधा होऊन या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हा सारा प्रकार घडला असून या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
मरण पावलेला तरुण शेतकरी हा 27 वर्षांचा असून त्याचं नावं कन्हैया असं आहे. शनिवारी सायंकाळी कन्हैया शेतात फवारणीसाठी गेला होता. घरी परतल्यानंतर जेवायला बसण्याआधी त्याच्या पत्नीनं त्याला हात धुवून जेवायला बसा असं सुचवलं होतं. मात्र कन्हैयाने हात धुण्यास नकार देत, मला जेवायला वाढ असं पत्नीला चढ्या आवाजात सांगितलं. पत्नीनेही फार वाद न घालता त्याला जेवायला दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनमधील प्रमुख आधिकारी असलेल्या रंजना सच्चान यांनी पतीने पत्नीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत तसेच जेवण केल्याने त्याला विषबाधा झाल्याचं सांगितलं.
रात्रीचं जेवण झाल्यानंतर कन्हैयाला मळमळल्यासारखं होऊ लागलं. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागलं. त्याची प्रकृती खालावत गेली. त्याला पत्नीने घरच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कन्हैयाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आल्याची माहिती, डॉक्टरांनी दिली.
किटकनाशकांमुळे होणाऱ्या मृत्यूची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी अशाच एका दुर्घटनेमध्ये 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. मद्यपान केल्यानंतर दारुच्या नशेत महाराष्ट्रातील पुणे येथे हा प्रकार घडला होता. 2023 साली बालेवाडीमधील या तरुणाने नोकरांच्या खोलीमधील किटकनाशक प्यायलं होतं. मरण पावलेल्या तरुणाचं नावं असीब मंडल असं होतं. हा प्रकार 24 ऑक्टोबर 2023 रोजी घडला होता आणि त्यानंतर उपचारादरम्यान 29 ऑक्टोबर 2023 रोजी असीबचा मृत्यू झाला होता.
2019 मध्ये उत्तर प्रदेशच्या गुरुग्राममधील सेक्टर 37 मधील मोहम्मदपूर झारसा गावातील एका 40 वर्षीय शेतकऱ्याने चुकून किटकनाशक प्यायलं होतं. हा प्रकार 20 मे रोजी घडला होता. या व्यक्तीला ताप येत असल्याने त्याने डॉक्टरांकडून औषध आणलं होतं. मात्र चुकून या औषधाऐवजी तो किटकनाशक प्यायला आणि त्याचा मृत्यू झाला होता.