Best Horror Thriller Movies: भयपटाची आवड असणाऱ्या अनेक प्रेक्षकांची पसंती ही कायमच चांगल्या कथानकांच्या चित्रपटाला असून, मोठ्या पडद्यावर कलाकारांनी उभी केलेली भीती कमालीची प्रेक्षकपसंती मिळवून जाते. सध्या प्रेक्षकांचा एकंदर कल पाहिल्यास साहसपट, भयपट, रहस्यमयी कथानक अशा चित्रपटांचीच चलती पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर विचारांमध्येही त्याची भीती कायमच राहणं हीच या चित्रपटांची जमेची बाजू असून, असाच एखादा चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी 'सिसिन' (Siccîn) हा एक उत्तम पर्याय.
जवळपास 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं कथानक जादूटोण्याभोवती फिरत असून, मेंदूला झिणझिण्या येतील अशी दृश्य या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. भीतीचा चेहरामोहरा नेमका कसा असतो, याचीच प्रचिती हा चित्रपट पाहताना येते. हा चित्रपट प्रत्यक्षात तुर्की भाषेमध्ये प्रदर्शित झाला असून, जागतिक स्तरावरही त्याला पसंती मिळाली.
काही संदर्भांमध्ये नोंद करण्यात आल्यानुसार हा चित्रपट इतका थरारक आहे की अनेकांनीच तो संपूर्णही पाहिलेला नाही. अल्पर मेस्टसीच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये मर्व एट्स, टॉयगन एट्स, एब्रू कायमाकी, पिनार कॅगलर गेनतुर्क, कोरे साहिनबास असे आघाडीचे तुर्की कलाकार असून, विकीपीडियावरील माहितीनुसार या चित्रपटातील दृश्य ही सत्य घटनांवर आधारित आहेत.
या चित्रपटाचं कथानक ओजनूर नावाच्या मुलीसह 4 जणांच्या एका कुटुंबाभोवती फिरतं, ज्या कुटुंबावर जादूटोणा करण्यात येतो. भावावर जडलेलं प्रेम, नकार आणि हा नकार पचवताना निर्माण झालेली घृणा पाहता कुटुंबावर होणारी काळी जादू याभोवती हे कथानक फिरतं. पाच दिवसात एका कुटुंबाता खात्मा होणं, ही धक्कादायक घटना चित्रपटाच्या कथानकाला कलाटणी देते. IMDb वर चांगली रेटिंग असणारा हा चित्रपट तुम्ही सबटायटलसह युट्यूब आणि नेटफ्लिक्स (Netflix) वर पाहू शकता.