उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण फक्त जग नाही तर अंतराळातूनही महाकुंभमेळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) असलेले नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी महाकुंभमेळ्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अवकाशातून त्याची भव्यता दिसत आहे.
डॉन पेटिट आपल्या अपवादात्मक खगोल छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. पेटिट यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून लिहिलं आहे की, "2025 महाकुंभमेळा गंगा नदीची तीर्थयात्रा रात्रीच्या वेळी ISS वरून. जगातील सर्वात मोठा मानवी मेळा चांगल्या प्रकारे प्रकाशित झाला आहे". संगमजवळील प्रयागराज हे तंबू शहर जे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम आहे ते चित्रांमध्ये झळकत आहे.
दर 144 वर्षांनी एकदा भरणारा महाकुंभमेळा, भक्तांच्या प्रचंड गर्दीसाठी आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. पृथ्वीपासून ताशी 28 हजार किमी वेगाने फिरणाऱ्या आयएसएसने त्याच्या हाय पॉवर कॅमेऱ्यांचा वापर करून या कार्यक्रमातील क्षण टिपला आहे. तेव्हापासून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2025 Maha Kumbh Mela Ganges River pilgrimage from the ISS at night. The largest human gathering in the world is well lit. pic.twitter.com/l9YD6o0Llo
— Don Pettit (@astro_Pettit) January 26, 2025
या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात महाकुंभ नगर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे, जो त्रिवेणी संगम येथे साजरा केला जातो, जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात. यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार तंबू आहेत. तसंच 3000 स्वयंपाकघरे, 1 लाख 45 हजार शौचालये आणि 99 पार्किंग लॉट आहेत.
या वर्षी, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करत आहे. महाकुंभमेळ्यासाठी सुमारे 26 हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आली आहे आणि सुमारे 12 किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केले आहे.