MNS Aggressive on Marathi issue : मराठीच्या मुद्दावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली. ओटीटी अॅपवरही मराठी भाषा असावी यासाठी अमेय खोपकर यांनी मनसैनिकांसोबत मुंबईतील ओटीटी कार्यालयात धाड टाकली. पोलिसांनी अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांच्यासह मनसैनिकांना ताब्यात घेतलंय.
ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर क्रिकेटचं प्रक्षेपण होत असताना मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मनसे आक्रमक झालीय. याच जाब विचारण्यासाठी मनसे चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मनसैनिकांसोबत हॉटस्टारच्या कार्यालयात धाड टाकली.
हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करताना समालोचनासाठी मराठीचा पर्याय देण्याची मागणी अमेय खोपकर यांच्याकडून करण्यात आली. मराठीमध्ये क्रिकेट समालोचनाचा पर्याय दिला जाईल, असे लेखी लिहून द्यावे. जोपर्यंत लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याची भूमिका अमेय खोपकर यांनी घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तुम्ही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल अमेय खोपकर यांनी जाब विचारला.
अमेय खोपकर यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की, मी भेटायला आलो नव्हतो धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे. हॉटस्टारवर जे क्रिकेटचे सामने दाखवले जातात, ते मराठीमध्ये समालोचन व्हावे यासाठी आम्हाला लेखी आश्वासन मागितलंय. आता हॉटस्टारने आम्हाला राज साहेबांच्या नावाने पत्र दिला आहे. आता मराठी भाषेचा सुद्धा समालोचन होणार असं त्यांनी लिहून दिला आहे.
खोपकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी माणसानेच करायचा इतर माणसांनी दादागिरी करायची नाही. हॉटस्टारमध्ये लवकरच मराठीत समालोचन सुरू करत आहेत. मी त्यांचा अभिनंदन करतो. मी बाकी मराठी माणसांना सुद्धा विनंती करतो की सामना पाहताना मराठी भाषेचाच वापर करावा.
शनिवारी 25 जानेवारीला झालेल्या भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामन्यात भारताने इंग्लंडला दोन गडी राखून विजय पटकावला. पण या सामन्याचे समालोचन हे हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगूसह बंगाली, हरियाणी, कन्नड आणि भोजपुरी या भाषेमध्ये पण होते, पण मराठी पर्याय नवह्ता. त्यामुळे मनसे आक्रमक झाली.