Maharashtra Bjp Adhiveshan: भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिर्डी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन झाले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लोकसभेतील पराभवानंतर अमित भाईंनी महाराष्ट्रात दौरा केला. कार्यकऱ्यांमध्ये प्राण फुंकले आणि कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. या लढाईत 24 तास आपल्या सोबत होते, असे म्हणत त्यांनी अमित शहांचे आभार मानले.
महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या. गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष ठरलाय. लोकसभेत आपल्या 17 जागा निवडून आल्या पण त्यानंतर आपण प्रयत्न केले. 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झाला. आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड भाजपने तोडला.फडणवीसांनी विजयाबद्दल बोलताना महाभारतातील युद्धाचा प्रसंग सांगितला.
महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना श्रीकृष्णाची उपमा देण्यात आली. लोकांची सेवा करणे ही राज्यकर्ता म्हणून आमची आणि कार्यकर्ता म्हणून तुमची जबाबदारी आहे. आपण सुखासीन झालो तर हा लोकांनी दिलेल्या जनमताचा अवमान ठरेल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
लोकसभेच्या काळात अराजकतावादी शक्तींचा प्रभाव महाराष्ट्रात होता. काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उबाठाने राज्यात व्होट जिहाद केला. निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. बांग्लादेशी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार याद्यांमध्ये घुसत आहेत. महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एक हैं तो सेफ हैं हे मोदींजींनी सांगितलं आणि ते निवडणुकीत खरं ठरलं, असे म्हणत फडणवीसांकडून एक हैं तो सेफ हैं चा पुनरुच्चार करण्यात आला. समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न हणून पडायचा असल्याचे ते म्हणाले.
सरकारप्रमाणे पक्षालाही शंभर दिवसांचा कार्यक्रम द्या, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्यातील पहिले उद्दिष्ट दीड कोटी सदस्य संख्या बनवणे असावे. सरकारचे कार्यक्रम खालपर्यंत कसे जातील यासाठी काम करावे लागेल. रोजगार देण्याचे नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनातील दुःख दूर करण्याचे साधन आहे. निधीचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून कानउघडणी करण्यात आली आहे. विधानसभेतील महाविजयाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विजय मिळवायचा आहे. त्यासाठी तयारीला लागा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.