दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है आणि विवाह असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सूरज बडजाच्या खासकरुन कौटुंबिक नात्यांवर भाष्य करत असल्याने प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांशी जोडले जातात. यामुळेच त्यांचा 'हम साथ साथ है' (Hum Saath Saath Hain) चित्रपट आजही टीव्हीवर त्याच उत्साहात आणि भावनेने पाहिला जातो. भाऊ, बहिण, आई, वडील, प्रेयसी असं प्रत्येक नातं या चित्रपटात अत्यंत सुंदरपणे रंगवण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, माधुरी दीक्षितलाही या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. पण सूरत बडजात्या यांनी नकार दिला होता.
'हम आपके है कौन' चित्रपटात सलमान खान आणि माधुरीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे आपल्या आगामी 'हम साथ साथ है' चित्रपटात ही जोडी पुन्हा दाखवली असती तर यश मिळणार हे हमखास होतं. मात्र असं असतानाही सूरज बडजात्या यांनी माधुरीला नकार दिला होता. त्यांनी यामागील कारणाचा उलगडाही केला होता. दरम्यान या चित्रपटासाठी जुही चावला, मनिषा कोईराला यांनाही विचारण्यात आलं होतं अशी चर्चा होती. पण सूरज बडजात्या यांनी या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं.
'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "माधुरीने मला 'हम साथ साथ है' दरम्यान फोन केला होता. मला चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल असं तिचं म्हणणं होतं. पण मी तिला सांगितलं की, हा पुरुषप्रधान चित्रपट आहे आणि जर मी तुला सलमानची अभिनेत्री म्हणून कास्ट केलं तर ती भूमिका फार छोटी आहे. आणि जर तुला मोहनीश बेहलच्या समोर कास्ट केलं तर तू सलमानच्या वहिनीच्या भूमिकेत असशील".
पुढे त्यांनी सांगितलं की, "पण माधुरी फार चांगली आहे. ती मला म्हणाली, मला फरक पडत नाही. तुमच्यासोबत काम करताना आनंद मिळतो. पण मी तिला सांगितलं की मी फार अस्वस्थ असेन".
अखेर मोहनीशी बेहलसोबत तब्बूला कास्ट करण्यात आलं. तब्बूवर त्यावेळी ठराविक भूमिकेचं ओझं नव्हतं. दुसरीकडे सलमान खानसोबत सोनाली बेंद्रेला हिरोईनची भूमिका मिळाली. प्रेक्षकांना त्यांची जोडीही आवडली. याशिवाय सैफ अली खान आणि करिश्मा कपूरही मुख्य भूमिकेत होते.