'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...'

Latur Sucide:   पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2025, 05:18 PM IST
'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...' title=
लातूर आत्महत्या

Latur Sucide: आर्थिक कर्जाचा डोंगर वाढल्याने शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली.  या  घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोवर आता लातूरमधून असाच एक काळीज चिरणारा प्रकार समोर आलाय. करिअरमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला. याआधी त्याने आपल्या आईला पत्र लिहून भावनिक साद घातली. आई मला माफ कर. माझ्यासाठी खूप खर्च केला. म्हणत पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका तरूणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश बापूराव यादव असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे.

'आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून...'

औसा तालुक्यातील बोरफळ येथील तरुण नागेश यादव हा घरातील परिस्थिती नाजूक असतानाही पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याने अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती. मात्र नेहमी एक किंवा दोन गुणांनी त्याला अपयशी व्हावे लागले होते. शेवटी मुंबई येथे त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत तो वेटिंगवर होता. दोन तीन जण वेटिंगवर असल्याने आपण भरती होणार नसल्याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो गेल्या कांही दिवसापासून उदासच होता. परिस्थिती हलाखीची असतानाही कुटुंबातील लोकांनी आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊन पोलीस बनण्याचे आपले स्वप्न भंगणार या नैराश्यात तो होता. बुधवारी सकाळी त्याने आईला पण याच भाषेत निराश होऊन बोलला होता. 

आईकडून दिलासा पण..

आईने त्याला 'घाबरू नकोस नाही लागली नोकरी तर कांही फरक पडत नाही. कष्ट करून आपण आपला उदरनिर्वाह करू, शेळ्या राखतोस तर अजून शेळ्या वाढवू त्यातून आलेल्या उत्पन्नावर जगू' असा धीर दिला. बुधवारी सकाळी शेळ्या घेऊन तो शेतीकडे उदास मनाने हातात पुस्तक घेऊन गेला. चार वाजता घरी आला. पुन्हा लाईट आल्याने मोटार चालू करतो म्हणून शेताकडे गेला आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

'आई मला माफ कर,माझ्यासाठी खूप खर्च केला'

नागेशच्या खिशात पोलिसांना एक सुसाईडनोट सापडली असून यामध्ये 'आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला. मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही. मला माफ कर... अशी आपल्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचे पोलिसांनी आणि नातेवाईकांनी सांगितले. परिस्थितीने गरीब असूनही सरकारी नोकरीसाठी धडपड करणारा एक गुणी तरुण गेल्याने बोरफळ गावावर शोककळा पसरली आहे.