Anganewadi Jatra 2025 : कोकण...(Konkan) नारळीपोफळीच्या बागा आणि अथांग समुद्र आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेलं हे जणू महाराष्ट्रातील स्वर्गच. पर्यटकांच्या प्राधान्यस्थानी कायमच हे ठिकाण आघाडीवर असतं. अशा या कोकणात दरवर्षी कैक उत्सव पार पडतात. त्यातचाल एक म्हणजे भराडी देवीचा यात्रोत्सव. दरवर्षीप्रमाणं यंदाही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंगणेवाडीच्या यात्रेचं नियोजन करण्यात आलं असून, देवी भराडीनं कौल दिल्यानंतर अखेर या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. परंपरेनुसार कोणतीही दिनदर्शिका किंवा तिथीचा आधार न घेता देवीला कौल लावून ही तारीख ठरवण्यात येते आणि यंदाही हीच परंपरा पुन्हा एकदा पार पडली.
आंगणे कुटुंबीयांच्या वतीनं यंदाच्या यात्रेची आणि देवीच्या उत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली असून, आता अनेकांनीच यात्रेसाठी जायची तयारीसुद्धा सुरू केली आहे. दरवर्षी कोकणात भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी गर्दी करतात. परदेशातूनही या यात्रेसाठी येणाऱ्यांचा आकडा मोठा असून, नेतेमंडळी आणि काही प्रसिद्ध नावांचीही इथं हजेरी पाहायला मिळते. थोडत्यात यंदाचं वर्षही इथं अपवाद ठरणार नाही.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे गाव असून, तिथंच देवी भराडीचं मंदिर आहे. या गावातील आंगणेवाडी नावाच्या वाडीत हे मंदिर असून, इथंच देवी भराडीचा वावर असल्याचं म्हटलं जातं. देवी भरडावर म्हणजेच माळरानावर प्रकटल्यामुळं तिला भराडी हे नाव मिळाल्याची आख्यायिका इथं सांगितली जाते.
ही आंगणेवाडीतील देवी असून, ती आंगणे कुटुंबीयांची देवी आहे. असं असलं तरीही देवीची ख्याती आणि महती सातासमुद्रापार पोहोचल्यामुळं आणि देवी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी अनेकांचीच धारणा असल्यामुळं दरवर्षी इथं कोकणातूनच नव्हे तर, विविध ठिकाणहून लाथो भाविक इथं दर्शनासाठी येतात. दीड दिवसांसाठी देवीचा हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. जिथं आंगणेवाडीच्या माहेरवाशिणी अतिशय खास पद्धतीनं अर्थात अबोल राहून देवीसाठी नैवेद्य तयार करतात असं म्हटलं जातं. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनाही हा प्रसाद दिला जातो.