Ajit Pawar Wishes Sharad Pawar On His Birthday: महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे स्वत: आज दिल्लीत आहेत. दिल्लीमध्येच आज अनेक नेते शरद पवारांची भेट घेण्याची दाट शक्यता असून वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करण्यासाठी या भेटीगाठी होतील असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आपल्या काकांना वाढदिवसानिमित्त एक खास संदेश पाठवला आहे. मागील दीड वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु असलेल्या या काका-पुतण्याच्या नात्याची वेगळी बाजू आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाली.
अजित पवार यांनी शरद पवारांच्या धोरणांविरोधात बंड पुकारत 2023 च्या मध्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अनेकदा भाजपासोबत जाण्याची चर्चा शरद पवारांनी केलेली असा दावा अजित पवारांकडून करण्यात आला. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या वाटेने जाताना अजित पवारांनी पक्षावर आणि पक्ष चिन्हं असलेल्या घड्याळावर दावा केला. दोन्ही गोष्टी निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे आमदार जास्त असल्याने त्यांच्याकडेच राहतील असं सांगितलं. याविरोधात शरद पवारांनी कोर्टात खटला दाखल केला असून हा खटला न्यायप्रविष्ठ आहे. असं असतानाच दुसरीकडे यंदा पहिल्यांदाच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हा पवार कुटुंबियांच्या दोन वेगवेगळ्या घरी साजरी झाली. शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानाबरोबरच अजित पवारांच्या काटेवाडी येथे वेगळं सेलिब्रेशन करण्यात आलं.
पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार हे आद्याप शरद पवारांसमोर सार्वजनिक मंचावर उपस्थित राहिलेले नाहीत. एक दोन वेळा अशी संधी आली तेव्हा अजित पवारांनी काकांना भेटणं टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे या काका-पुतण्यामध्ये अगदी कोर्टापासून ते खासगी आयुष्यातही पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. अशातच आज काकांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी काकांना खास मेसेज पाठवला आहे.
नक्की वाचा >> Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे पाहिलं का?
अजित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन शरद पवारांचा एक फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. "आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.", असं अजित पवारांनी काकांचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांच्या पक्षाला धूळ चारल्याचं दिसून आलं. शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला तर अजित पवारांच्या पक्षाने 41 जागा जिंकल्या. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काकांचा पक्ष पुतण्याच्या पक्षापेक्षा सरस ठरला होता. अजित पवारांना लोकसभेची एकच जागा जिंकता आली होती. तर त्यावेळेस शरद पवारांनी 8 खासदार निवडून आणलेले.