पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतिक आरण नावाच्या तरुणाला फोनवरुन शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर याच प्रकरणावरुन तिघांनी प्रतिकला मारहाण केली.
Updated: Apr 22, 2018, 04:43 PM IST
मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरमध्ये पैशाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गाडीची चावी घुसवल्याची घटना घडली. या घटनेनंतर जखमी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चावी काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. पाच दिवसांनंतर या तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
अहमदनगरमधील एका तरुणाच्या डोक्याची ही अवस्था अंगाचा थरकाप उडवणारी अशीच होती... पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतिक आरण नावाच्या तरुणाला फोनवरुन शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर याच प्रकरणावरुन तिघांनी प्रतिकला मारहाण केली.
या मारहाणीत अक्षय चेमटे नावाच्या तरुणाने प्रतिकच्या डोक्यात चावी खुपसली. चावी डोक्यात खुपसल्यानंतर त्यावर जोरानं दाबल्याने ती थेट प्रतिकच्या डोक्यात मेंदूपर्यंत घुसली. यामुळे प्रतिक जमिनीवर कोसळला. त्याला उपचारासाठी आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णाला पाहून डॉक्टरही चक्रावले. कारण डोक्यात कवटीला छेद देत बाईकची चावी आतपर्यंत घुसली होती.
त्यामुळे साडे-तीन तासांच्या प्रयत्नानंतर प्रतीकवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं, अशी माहिती हॉस्पीटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी दिलीय.
दैव बलवत्तर म्हणून या प्रकरणी प्रतिकच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेच त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात मारहाण आणि खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय. मात्र, या घटनेनंतर गुन्हेगारीची पातळी कोणत्या थरावर जाऊन पोहचलीय याचा विचार करण्याची वेळ आलीय.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.