रामराजे नाईक निंबाळकरांच्या बंधूंच्या घरावर आयटी विभागाचा छापा, WhtasApp स्टेटस ठेवत म्हणाले 'उगाच गर्दी...'

Income Tax Raid: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयटी विभागाने छापा टाकला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 5, 2025, 01:31 PM IST
रामराजे नाईक निंबाळकरांच्या बंधूंच्या घरावर आयटी विभागाचा छापा, WhtasApp स्टेटस ठेवत म्हणाले 'उगाच गर्दी...' title=

Income Tax Raid: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयटी विभागाने छापा टाकला आहे. पुणे, साताऱ्यातील घरांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या पथकाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर तपास सुरू आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये तपास सुरू असून, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे.  बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे. 

सहकाऱ्यांवरही छापे

रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणाची धाड पडली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी चौकशी करत आहेत. आयकर विभागाने ही धाड टाकली आहे.  तसंच फलटणमधील मलठण येथे देखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे सहकारी रणवरे यांचा घरावर देखील छापा टाकला असून त्यांची चौकशी सुरु आहे.  

निंबाळकरांचं व्हॉट्सअॅप स्टेटस

 दरम्यान रामराजे निंबाळकरांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून खात्याला काम करु देण्याचं आवाहन केलं आहे. कृपया गर्दी करु नका. आयकर खात्याला काम करु द्या. काळजी नसावी. असं या स्टेटसमध्ये रामराजे निंबाळकरांनी म्हटलं आहे. 

फलटण पाठोपाठ इंदापू मध्ये देखील तपास यंत्रणांनी धाडी टाकल्य आहेत. नेचर डिलाईटच्या देसाई आणि जामदार यांच्या घरी तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. नेचर डिलाईट डेअरीच्या ठिकाणी ही तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरू आहे. 

फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काही खासगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नेचर डिलाईटचे अर्जुन देसाई यांच्या घरी देखील आज सकाळी पहाटेपासूनच अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र कोणत्या खात्याचे हे अधिकारी आहेत हे अद्याप समजू शकले नाही,मात्र आयकर विभागाची ही धाड असल्याचा अंदाज लावला जातोय

देसाई यांच्या घरी सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले असून कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. यासोबतच देसाई यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तर दुसरीकडे देसाई यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या मयूर जामदार यांच्या घरी देखील आज सकाळपासून तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

तर अर्जुन देसाई आणि मयूर जामदार यांच्याशी निगडित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरी च्या ठिकाणी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळपासूनच पोहचले असून त्या ठिकाणी देखील कसून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर इंदापूर बारामती मार्गावर चिखली फाट्यावरील देसाई हॉस्पिटल या ठिकाणी देखील ही तपास यंत्रणा पोहचली असल्याची माहिती मिळत आहे.