हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काळात पोटखराबा आणि जिरायत असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आता बागायती खाली येणार आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.
गेली कित्येक वर्षापासून ओलिताखाली असलेले बागायती क्षेत्र परंतु सातबारावर या क्षेत्राचा उल्लेख पोटखराबा किंवा जिरायत असा होता. पण हे क्षेत्र बागायत खाली येणार असून याचा सातबारा उताऱ्यावर बागायत असा उल्लेख होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.
इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा इंग्रजांकडून भारतातील शेतजमिनीची प्रतवारी ठरवली गेली. यामध्ये खडकाळ जिरायत आणि बागायत अशी जमिनीची प्रतवारी ठरवली गेली, या नंतर भारत स्वातंत्र्य झाला. इंग्रज भारतातून गेले भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष झाली. परंतु शेतजमिनीची प्रतवारी ही इंग्रजांनी केलेलीच राहिली. या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी या खडकाळ जिरायत जमिनी ओलिताखाली आणल्या. परंतु या जमिनींची सातबारावर बागायत अशी नोंद झालीच नाही.
त्यामुळे याचा फटका राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बसत होता. शेतजमीन बागायताखाली असून देखील या शेतजमीनीची सातबारावर जिरायत पोटखराबा असा उल्लेख असायचा. यामुळे राज्यातील लाखो शेतकय्रांना पिक कर्ज, पिक विमा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागायचा. परंतु सरकारने आता या शेतजमिनी सातबारावर बागायताखाली आणण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.