मुंबई : अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची (Heavy rains) शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अति मुसळधार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Heavy rains in Maharashtra in next five days)
पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात यंदा मोसमी पावसाने वेगाने प्रगती केली. 5 जूनला कोकणातून दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्याने राज्य व्यापलं. मात्र काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी, तर काही ठिकाणी सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच महिन्यात राज्यात असमान पाऊस झाल्याचं स्पष्ट झाले आहे. एकूण राज्यात सरासरीपेक्षा अधिक 40 टक्के पाऊस झाला आहे.
1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. यात किनारपट्टी लगतच्या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टीही होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.