शेतीसाठी 12 हजार किमीचा प्रवास, उभारलं शेतकऱ्यांना रोज उत्पन्न देणारं मॉडल; मुक्तक जोशींची प्रेरणादायी कहाणी!

Muktak Joshi Inspirational Story: मुक्तक जोशी हे संभाजीनगरमध्ये ऑलगॅनिक फार्म चालवतात. ज्यामध्ये 100 टक्के नैसर्गिक फळे आणि भाज्यांचे उत्पादन केले जाते. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2025, 04:51 PM IST
शेतीसाठी 12 हजार किमीचा प्रवास, उभारलं शेतकऱ्यांना रोज उत्पन्न देणारं मॉडल; मुक्तक जोशींची प्रेरणादायी कहाणी!
मुक्तक जोशी प्रेरणादायी कहाणी

Muktak Joshi Inspirational Story: चांगले शिक्षण घ्यायचे, मोठ्या पॅकेजची नोकरी करायची आणि परदेशात जाऊन सेटल व्हायचं असं आजकालच्या बहुतांश तरुणांना वाटतं. त्यामुळे बहुतांशजण दिवसातील 12-14 तास नोकरी, व्यवसायातून पैसा कमावण्याच्या मागावर दिसतात. पण दुसरीकडे अशीही एक पिढी आहे, जिला पैशाच्या मागे धावण्यापेक्षा शेतीत राबण, त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणं, यात स्वारस्य वाटतंय. औरंगाबादचे शेतकरी मुक्तक जोशी हे या पिढीचं उदाहरण आहे. 

मुक्तक जोशी हे संभाजीनगरमध्ये ऑलगॅनिक फार्म चालवतात. ज्यामध्ये 100 टक्के नैसर्गिक फळे आणि भाज्यांचे उत्पादन केले जाते. येथे गावरान गाई आणि कुक्कुट पालन केले जाते. शुद्ध देशी दूधाचा फार्म, पोल्ट्री फार्म, फीश फार्म, बदक, मधमाशी पालनदेखील ते करतात. शहराकडून शेतीकडे वळू इच्छिणाऱ्या तरुणांनी काय काळजी घ्यायला हवी? कशी सुरुवात करायला हवी? कोणत्या चुका टाळाव्यात? याचे मार्गदर्शन मुक्तक जोशी ऑलगॅनिक फार्म च्या सोशल मीडियावरुन देत असतात.   

76 कमर्शियल प्रोजेक्टवर काम

मुक्तक जोशी यांनी साधारण 12 ते 13 वर्ष कॉम्प्युटर प्रोग्रामिंग केले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वत:ची पहिली कंपनी स्थापन केली. स्वतःला येणाऱ्या अडचणी सोडवता सोडवता नवीन नवीन सॉफ्टवेअर बनवत प्रॉडक्ट बनवून ते विकू लागले. इंजीनियरिंग उत्तीर्ण होईपर्यंत त्यांचे 76 कमर्शियल प्रोजेक्ट झाले होते. 1998 पासून मुक्तक यांनी परदेशात तील ग्राहकांसाठी काम करायला सुरुवात केली. यानंतर 2020 मध्ये रिटायर्टमेंट घेतली.  त्यानंतर मुक्तक यांनी एकूण सात कंपन्या उभ्या केल्या. त्यामध्ये कधी ते कधी स्वत: व्यवसाय चालवायचे तर कधी भागीदारांना सोबत असायचेय. 2009 साली तिकीट यूटील्स नावाने त्यांनी अमेरिकन भागीदाराबरोबर एक कंपनी सुरु केली. 2012 पासून त्यांनी अमेरिकेत अर्ध वेळ राहणे सुरू केले. मुक्तक यांची सहावी कंपनी eBay नावाच्या एका बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीने विकत घेतली. यानंतर 2016 पासून 2020 पर्यंत त्यांनी ईबेसोबत काम केले. 

शेती करण्याचा निर्णय

मुक्तक यांना त्यांच्या कामात उत्तरोत्तर यश मिळत होतं. दुनियेच्या नजरेत ज्यांना 'सेटल' म्हटलं जातं, त्या टप्प्यापवर मुक्तक पोहोचले होते. पण हे सर्व सुरु असतानाच त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. जिथून त्यांना शेतीकडे वळण्याची, मातीत राबण्याची प्रेरणा  मिळाली.   2019 मध्ये मुक्तक यांनी एक रिपोर्ट वाचला. ज्यामध्ये 'जमिनीचा पोत कमालीच्या वेगाने घटतो आहे. मराठवाड्यामध्ये तो साधारणतः 0.2% झाला आहे. हे सर्व रसायने, कीटकनाशके, तणनाशके यांच्या अतिवापराने हे होतंय. असेच चालू राहिले तर येत्या 70 वर्षांमध्ये पूर्णपणे पीक होणे बंद होईल.', असं त्यांच्या वाचनात आलं. मुक्तक यांनी अशा काही गोष्टी वाचल्या ज्यात वाळवंट होण्याचा रेट हा भारतात 7.8% झालेला आहे. म्हणजे दरवर्षी एवढी सुपीक जमीन वाळवंटात रुपांतरीत होतेय, हे त्यांचा लक्षात आलं. आणि मुक्तक यांना ते अस्वस्थ करणारं होतं.  

मुक्तक आणि त्यांच्या पत्नी भारतात असताना शेतकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करायचे आणि त्यांना मार्गदर्शन करायचे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचे. एकदा शेतकऱ्यांना असाच सल्ला देत असताना एका शेतकऱ्याने म्हटलं, 'साहेब एसीत बसून फालतू सल्ले देऊ नका'. तेव्हापासून मुक्तक यांचे मन विचलित झाले. 'शेतकरी जे बोलला ते बरोबर आहे', असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 'मी कोण होतो उपदेश करणारा?' असे त्यांना वाटू लागले. यानंतर आता आपण शेती करायची आणि जे आपण लोकांना करायला सांगतोय ते स्वतः करून दाखवायचं, असे मुक्तक आणि त्यांच्या पत्नीने ठरवले.  

 सद्यस्थितीत शेतीत असंख्य अडचणी असल्याचे आले लक्षात

तोवर मुक्तक यांनी मातीत कधीही हात घातला नव्हता. सुरुवातीला घराच्या गच्चीवर एक्वापोनिक्स या पद्धतीने मासे पाळून त्यांचे पाणी सर्क्युलेट करून भाज्या उगवायला त्यांनी सुरुवात केली. त्याबरोबर त्यांचे शेतीविषयक वाचन सुरुच होते. पण एक्वा पोनिक्स हा खर्चिक प्रकार आहे आणि तो सर्वसामान्य शेतकऱ्याला झेपणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेवटी पारंपारिक मातीतील शेती करायचे त्यांनी ठरवले. शेती काय असते हे माहिती करुन घ्यायचे त्यांनी ठरवले. त्यांनी गाडी काढली आणि महाराष्ट्रापासून मध्यप्रदेशापर्यंत 12 हजार किलोमीटर फिरलो. या काळात त्यांनी प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची शेती पाहिली, 16 वेगळी वेगळी शेतीची मॉडेल अभ्यासली. मिळेल तो ग्रंथ पुस्तक वाचायला घेतले.तेव्हा मुळात सद्यस्थितीतील शेतीत असंख्य अडचणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शेतीत केमिकलचा वापर होतोय. पण मोनो कल्चर, लागवडीच्या पद्धती, जे सेंद्रिय करतात त्यांची संपूर्णपणे गो आधारित शेती. त्या सर्व प्रॉब्लेमचे निर्मूलन करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग मुक्तक आणि त्यांच्या पत्नीने मिळून पुढील 5 वर्षाचा मास्टर प्लॅन करायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांना गोआधारित शेती करायची नव्हती. कारण गाय पाळणे तिला खाऊ घालणे हेच एक मोठे कार्य होते. साधारण 82 शेती प्रकार पाहून त्यांनी एक शेत जमीन विकत घेतली. शहरापासून वीस किलोमीटरच्या आत, अगदी रस्त्यावर नसलेली, आजूबाजूला फार केमिकल शेती नसलेली अथवा शेजार कमी असलेली अशी जंगलातली कोपऱ्यातली शेती हवी होती. या सर्व अटी पूर्ण होऊन जमीन मिळायला त्यांना बराच वेळ गेला.

भाज्यांच्या प्रयोग यशस्वी 

धान्य कडधान्य करायचा त्यांना कोणताच अनुभव नव्हता पण भाज्या पिकवायचा अनुभव एक-दीड वर्षाचा झाला होता. त्यामुळे त्यांनी नवीन जमिनीत भाज्याच पिकवायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी 49 प्रकारच्या भाज्या त्यांनी लावल्या आणि हा प्रयोग यशस्वी झाला.
सुरुवातीला भाजी विकणे खूप अवघड जात होते. त्यामुळे मंदिराच्या बाहेर बसून त्यांनी भाजी विकायला सुरुवात केली. नंतर त्यांनी एक ई रिक्षा घेतली आणि तिथून सोसायटी टू सोसायटी फिरवून भाजी विकायला लागले. त्यानंतर घराबाहेर त्यांनी एक छोटसं दुकान उघडले. हळूहळू करत 400 लोकांचा ग्रुप तयार झाला. आता त्यांना भाज्या किंवा कुठल्याही शेतमाल विकायला कुठेही जायला लागत नाही. लोक त्यांच्या घरी येऊन भाज्या घेऊन जातात.

गो-पालनाचा व्यवसाय

या यशस्वी प्रयोगानंतर हळूहळू 32 प्रकारची फळझाडे मुक्तक यांनी लावली. मल्टी लेयर फार्मिंगचे मॉडेल बनवून ते करायला सुरुवात केली. दहा-बारा कोंबड्या पाळल्या. मुक्तक यांच्या सासूबाईंनी अधिकचे वाढ म्हणून त्यांना एक गाय दिली. तिथून गाई पालनाची सुरुवात झाली.  आता त्यांच्याकडे सद्यस्थितीला 18 जनावरे आहेत. अर्ध्या दुधाचा रतीब त्यांनी लावलेला आहे. मुक्तक यांची टीम आता घरपोच दूध देते. उरलेल्या अर्ध्या दुधाचे पारंपारिक पद्धतीने लोणी काढले जाते. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने त्याचे तूप केले जाते आणि ते तूप विकले जाते. यांचे ताक इतके सुंदर असते की त्याचाही लवकर रतीब लागतो. 

शेळीपालनाची सुरुवात 

नंतर मुक्तक यांनी दोन-तीन शेळ्या विकत घेतल्या आणि त्या शेळ्यांच्या चाळीस पर्यंत शेळ्या केल्या. 2024 मध्ये शेळ्यांचा धंदा बंद करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कुठलाही शेतमाल व्यापाराला न विकण्याची शपथ घेतली आहे. शेळ्या आम्हाला नेमक्या व्यापाऱ्याला विकायला लागायच्या त्यामुळे शेळीपालन बंद केल्याचे मुक्तक सांगतात.

कुक्कुटपालनात एन्ट्री 

2023 मध्ये पाऊस झाला नाही. तेव्हा कोंबड्या वाढवायचे  त्यांनी ठरवलं. बघता बघता 15 कोंबड्यांच्या त्यांनी साडेचारशे कोंबड्या केल्या. पुढे जाऊन बाजारात अंडी विकायला सुरुवात केली. आता अंड्यांची मागणी एवढी वाढली आहे की त्यासाठी वेटिंग लिस्ट असते. 

चाऱ्याची अडचण केली दूर 

2024 मध्ये मुक्तक यांना चाऱ्याची अडचण येऊ लागली. त्यामुळे त्यांनी अजून साडेतीन एकर जमीन विकत घेतली. आणि शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने चारा करायला सुरुवात केली. गाईंवर काम करून सरकी पेंड देणे बंद केले होते. त्यांच्या पोषणावर काम करून दुधाचे फॅट आणि दुधाचे गुणधर्म बदलले. तसेच कोंबडीच्या पोषणावर काम करून कोंबड्यांचा आकार, अंड्यांचा आकार कोंबड्यांचे वजन झटपट वाढवण्यावर खूप काम केल्याचे मुक्तक सांगतात. 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नुकताच मुक्तक आणि त्यांच्या टीमने एक छोटा शेत तलाव बांधला आहे. त्यामध्ये मत्स्यपालन करण्याचे नियोजन आहे. एक जोडी बदक आणि एक जोडी हंस हे विकत घेतले आहेत. शेतकऱ्याला दर दिवशी, दर आठवड्याला, दर महिन्याला, दर तिमाईला, दर सहामाई, आणि दरवर्षी उत्पन्न मिळावे असे मॉडेल आम्ही तयार केले आहे. आणि हे मॉडेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न चालू असल्याचे मुक्तक सांगतात. आमचे व्हिडीओ पाहून किंवा इतर कोणतेही प्रेरणादायी व्हिडीओ पाहून थेट शेती व्यवसायात उतरण्याची चूक करु नका, असे ते तरुणांना सांगतात. आधी शेती व्यवसायात येणाऱ्या अडचणी समजून घ्या, यासाठी तुम्ही आर्थिक, मानसिकदृष्ट्या तयार आहात का? हे ओळखा आणि यानंतरच शेती व्यवसायात या, असे ते तरुणांना सांगतात.