Mahakumbh 2025 : सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे. देशभरातील महिला-पुरूष येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. संगमावर आंघोळा करतानाचे महिलांचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. ज्यामध्ये संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी अमूक अमूक रक्कम भरा असे आवाहन करून लूट केली जात होती. शिवाय राज्यातील काही हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही हॅक करून तेथील महिलांचे व्हिडीओ हस्तगत करून फॉलोअर्स वाढविणे असे खाजगी व्हिडीओ विकण्याचाच प्रकार काही तरूण करत असल्याची माहिती मिळाली होती.
या प्रकरणी गुजरात आणि अहमदाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुजरात पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील जत येथे लातूरमधील नीटची परीक्षा तयारीसाठी असलेल्या प्रज्वल तेली या विद्यार्थ्यास लातूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. प्रज्वल हा लातूरच्या नारायण नगर भागात राहत होता अशी माहिती आहे. या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी प्रयागराज येथून इतर दोघांना अटक केल्याची माहीती मिळत आहे.
महाकुंभमेळ्यातील धक्कादायक प्रकार समोर
कुंभमेळ्यातील महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ प्रकरणी सांगलीच्या शिराळा येथील प्राज पाटील सह लातूरच्या प्रज्वल तेलीसह तिघांना गुजरातच्या अहमदाबाद सायबर क्राईमने अटक केली आहे. प्राज पाटील हा शिराळा तालुक्यातला चिखलीचा असून लातूरच्या प्रज्वल तेली याच्यासोबत नीटपरीक्षेचे निमित्ताने लातूरमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांनी प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद यांच्या माध्यमातून महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ त्याचबरोबर गुजरातच्या महिला प्रसूती ग्रहांमधील व्हिडिओ डार्क वेबवर विकल्याचाही प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.
प्राज पाटील याला सांगलीच्या शिराळामधून शिराळा पोलिसांच्या मदतीने अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचने अटक केली आहे. तर प्रज्वल तेली याला लातूरमधून अटक करण्यात आली आहे. तिघांनी डार्क वेबसाईट तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ 2000 रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात महाकुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत.