Chhagan Bhujbal: भाजपप्रमाणं आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचंही अधिवेशन होणार आहे. तेही भाजपप्रमाणे शिर्डीतच होणार आहे. मात्र या अधिवेशनात कोण येणार, यापेक्षा कोण दांडी मारणार याचीच चर्चा जास्त रंगलीय. तुम्ही बरोबर अंदाज लावलात.छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं भुजबळांची दांडी ही बंडाची नांदी आहे का याची चर्चा सुरू झालीय.
उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन शिर्डीत सुरू होतंय. मात्र अधिवेशनाच्या इतर मुद्द्यांपेक्षा सध्या जास्त चर्चा आहे ती माजी मंत्री छगन भुजबळांची.. कारण राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे जुने जानते नेते, माजी मंत्री छगन भुजबळ दांडी मारणार आहेत अशी चर्चा सुरूय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र हे आजारपण राजकीय असल्याचीच चर्चा जास्त रंगलीय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतर राष्ट्रवादीचं हे पहिलं राज्य अधिवेशन आहे. ज्या स्वत: अजित पवार दोन्ही दिवस नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र छगन भुजबळ मात्र या अधिवेशनाला गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं भुजबळांची नाराजी अजूनही दूर झाली नाही का, की भुजबळ हळूहळू पक्षापासूनही दूर होताहेत अशी चर्चा सुरूय.
आठ दिवसापूर्वी शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. त्याच शिर्डीत पुष्पक हॉटेलमध्ये 18, 19 जानेवारीला राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह दिग्गज नेते सहभागी होतील.मंत्री, खासदार, आमदारांसह 700 पदाधिकारी अधिवेशनाला येणार आहेत. अधिवेशनात राज्यस्तरीय सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मंथन होईल.
राष्ट्रवादीच्या इतक्या महत्त्वाच्या अधिवेशनापासून छगन भुजबळ मात्र लांब राहताहेत.. आधीही मंत्रीपद न दिल्यानं भुजबळांनी उघड नाराजी बोलून दाखवली. शपथविधी सोहळा आणि नंतर नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला त्यांनी दांडी मारली. त्यावेळी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न ना अजित पवारांकडून झाले, ना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंकडून.. आताही राष्ट्रवादीच्या अधिवेशनात भुजबळांना स्वपक्षियांचे कान टोचता आले असते.. मात्र गैरहजर राहून आपल्या वेगळ्या वाटचालीचे संकेत भुजबळ देताहेत का अशीच चर्चा रंगलीय.