Chhatrapati sambhaji Maharaj : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांच्या निर्मितीत साकारलेला 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यानं चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेची जबाबदारी स्वीकारत ती लिलया पेलली. रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारताना जीव ओतून केलेलं काम विकीला चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी जागा मिळवून देण्यास कारणीभूत ठरलं. ज्या ताकदीनं विकीनं ही भूमिका साकारली ते पाहताना छत्रपती संभाजी महाराचांचं रुप जणू प्रत्यक्षात उतरलं आहे हाच भास अनेकांना झाला, तर काहींच्या मनात प्रश्न पडला छत्रपती संभाजी महाराज कसे बरं दिसत असतील?
छत्रपती संभाजी महाराज अगदी थोरल्या राजांप्रमाणे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच दिसायचे असं ऐतिहासिक संदर्भ सांगतात. मोठे डोळे, बाकदार नाक, राखलेल्या दाढीमिशा, चेहऱ्यावर तेज आणि करारीपणा असंच त्यांचं रुप होतं, ही बाब ऐतिहासिक पुराव्यांमधून लक्षात येते.
असं म्हणतात की कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा कवी कलशांनी खास, प्रत्ययकारी शब्दांमध्ये राजांची महती औरंगजेबाला सांगितली. ते शब्द होते...
''यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग।
लहु लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग।
ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग।
त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग।''
ऐतिहासिक उल्लेख असणारी कागदपत्र आणि शंभूराजांच्या चित्रांवरून अधिकृत चित्र ठरवण्यासाठी म्हणून राज्य शासनानं साधारण वर्षभरापूर्वी कोल्हापूर आणि सातारा राजघराण्याकडून सरकारनं शंभूराजांच्या चित्रांच्या प्रती मागवल्याचं म्हटलं जातं. यामध्ये राजांच्या समकालीन चित्रांचा उल्लेख चर्चेचा विषय ठरला आणि आता महाराज नेमके कसे दिसत असतील याच प्रश्नानं पुन्हा अनेकांच्या मनात घर केलं. दरम्यान, ब्रिटीश कालखंडात रायगडाच्या विध्वांसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचीही चित्र नष्ट झाल्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास वस्तू संग्रहालयात छत्रपती संभाजी महाराजांची दोन चित्र आढळतात. ही चित्र साधारण 300 वर्ष जुनी असावीत असं म्हटलं जातं. शिवराम चितारी यांनी ही चित्र रेखाटल्याचा तर्क लावला जातो. या दोन चित्रांपैकी एका चित्रात महाराज उभे दिसत असून, त्यांच्या हाती तलवार दिसत आहे. पारदर्शी अंगरखा, डोक्यावर पगडी, हाती दांडपट्टा दिसत आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर तेज दिसत आहे.
दुसऱ्या चित्रात राजे बैठकीत दिस असून, मोठं कपाळ, त्यावर चंद्रकोरवजा टीळा, भेदक डोळे, कोरलेल्या दाढीमिशा ही या चित्राची वैशिष्ट्य. विजय देशमुख यांनी मराठा पेंटींग या पुस्तकात या चित्रांवर सविस्तर मांडणी केली आहे. अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये या चित्रांचा उल्लेख आढळतो अशी माहिती इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी माध्यमांना दिल्याचं म्हटलं जातं.
लंडनमधील ब्रिटीश म्युझियममध्ये असणाऱ्या चित्रात छत्रपती संभाजी महाराज वीरासनात बसल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या उजव्या हातात फूल, डोक्यावर पागोटं, त्यावर मोत्यांचा तुरा, अंगरखा आहे. महाराजांचा चेहरा करारी दिसत असून, कपाळी नामगंध आहे. टोकदार मिशा आणि कोरली दाढी असून, या चित्रामध्ये महाराजांच्या इतर चित्रांप्रमाणंच डोळे आणि नाकाची आखणी पाहायला मिळते असं सांगण्यात येतं. 1855-56 मध्ये जेव्हा हे चित्र लंडनला नेण्यात आलं तेव्हा चित्रांची पुनर्बांधणी झाली मात्र या चित्राचा फारसा मागोवा घेण्यात आला नाही.
इतकंच नव्हे, तर नेदरलँडमधील Rijksmuseum इथंही एक चित्र असून, मुघल जीवनशैलीचा या चित्रावर प्रभाव आढळतो. मात्र इतिहासकारांच्या दाव्यानुसार मात्र ते छत्रपती संभाजीराजांचं चित्र नाही. दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराज यांची फार कमी चित्र अस्तित्वात आहेत. असं असलं तरीही राजांचं शाब्दिक वर्णन पाहता त्यांची प्रतिभा किती प्रभावी असेल याचा अगदी सहज अंदाज लावता येतो.